CET Student Helpdesk: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटी सेल विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू होणार; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा; १० जून २०२६ पासून सेवा होणार सुरू

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP), विविध शासकीय शिष्यवृत्ती योजना आणि प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर अचूक माहिती व योग्य मार्गदर्शन त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटी सेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका विशेष उच्चस्तरीय बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण निर्णयाची सविस्तर माहिती देताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी आणि त्यांना प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर विश्वासार्ह माहिती व अचूक मार्गदर्शन सहजपणे उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ही ‘CET Student Helpdesk’ केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील छोट्या-मोठ्या कामांसाठी वारंवार मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये फेऱ्या माराव्या लागू नयेत, त्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती तसेच आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन त्यांच्याच जिल्ह्यात मिळावे, हा यामागील मुख्य हेतू आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ४० सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन मुंबईत ३, पुण्यात २ आणि नागपुरात २ केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. यापैकी २६ केंद्रांचे पायाभूत काम पूर्ण झाले असून, ६ केंद्रे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित ८ केंद्रेही अत्यंत जलद गतीने कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ही सर्व केंद्रे आगामी १० जून २०२६ पासून अधिकृतपणे आपली सेवा सुरू करणार आहेत.

‘सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रां’ची प्रमुख उद्दिष्टे आणि सेवा:

  • समन्वय व संवाद: जिल्ह्यातील स्थानिक शैक्षणिक संस्था, परीक्षा केंद्रे आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) यांच्यात थेट समन्वय साधणे.
  • प्रवेश प्रक्रिया व तांत्रिक सहाय्य: विद्यार्थ्यांना कॅप (CAP) फेऱ्यांशी संबंधित अभ्यासक्रम, पात्रता निकष, परीक्षा पद्धत, वेळापत्रक, अर्ज भरणे, शुल्क भरणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि हॉल तिकीट संबंधित तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी फ्रंट डेस्कवर प्रत्यक्ष मदत करणे.
  • तक्रार निवारण: विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे, पेमेंट गेटवेच्या समस्या हाताळणे आणि स्थानिक पातळीवर न सुटणाऱ्या तक्रारी उच्चस्तरीय निवारणासाठी पुढे पाठवणे.
  • करिअर व शिष्यवृत्ती मार्गदर्शन: विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार योग्य अभ्यासक्रम व संस्था निवडण्यासाठी ‘अंदाजात्मक समुपदेशन’ (Predictive Counselling) देणे, तसेच विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती पुरवणे.
  • रोजगार समुपदेशन: विद्यार्थ्यांना शैक्षणिक समुपदेशनासोबतच भविष्यातील इंटर्नशिप व रोजगाराच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करणे.

या नवीन व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांची आर्थिक आणि मानसिक ससेहोलपट थांबणार असून, संपूर्ण प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता येईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 09-06-2026