◼️ २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ६७.२८ मिमी पावसाची नोंद; राजापुरात सर्वाधिक पाऊस
Ratnagiri Monsoon Updates : रत्नागिरी जिल्ह्यात सोमवार सायंकाळपासून मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला असून, मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहराला झोडपून काढले आहे. या पहिल्याच जोरदार पावसामुळे रत्नागिरी शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. नगर परिषदेच्या मान्सूनपूर्व नियोजनातील त्रुटींमुळे पहिल्याच दिवशी शहरातील नाले तुंबल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. रस्त्यांवर साचलेल्या सांडपाण्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकांना वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६७.२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद राजापूर तालुक्यात झाली असून, तिथे २६.१३ मिमी पाऊस पडला आहे. राजापूरसह जिल्ह्यातील अन्य सर्वच तालुक्यांमध्ये मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. आज दिवसभर जिल्ह्यात दाट ढगाळ वातावरण निर्माण झाले होते आणि अधूनमधून पावसाच्या मुसळधार सरी कोसळत होत्या. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी नागरी सुविधांच्या दुरवस्थेमुळे स्थानिक नागरिकांचे हाल झाले आहेत.
रामआळी परिसरात भरपावसात काम; दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती
शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेला व्यापारी भाग असलेल्या रामआळी परिसरात नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराचा फटका स्थानिक दुकानदारांना बसला आहे. रामआळी येथील मुख्य गटाराचे काम वेळेत पूर्ण न करता ते अर्धवट सोडण्यात आले होते. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या अर्धवट गटाराचे पाणी रस्त्यावर आले, ज्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. दुकानांच्या दारातच पाणी साचल्याने ग्राहकांनी पाठ फिरवली, तसेच दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
वाहतूक बंद करून काम सुरू; नागरिकांसमोर यक्षप्रश्न
पावसाचा जोर वाढल्यानंतर नगर परिषद प्रशासनाला जाग आली असून, मंगळवारी रामआळीतील अंतर्गत वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. वाहतूक वळवून भरपावसात या गटाराचे काम घाईघाईने सुरू करण्यात आले होते. मात्र, आता ऐन मुसळधार पावसात सिमेंट आणि काँक्रीटीकरणाचे हे गटाराचे काम तांत्रिकदृष्ट्या टिकणार कसे आणि ते पूर्ण कसे होणार, असा संतप्त प्रश्न स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. मान्सूनपूर्व कामांचे नियोजन वेळेत न केल्यामुळेच आज रत्नागिरीकरांना या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 10-06-2026














