FDA Commissioner Tukaram Mundhe: राज्यात गुटखा तस्करांविरुद्ध ‘मकोका’ लागू करणार; तुकाराम मुंडेंचा कडक इशारा

आतापर्यंत ३ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त; बेकायदेशीर रॅकेटमध्ये सामील असणाऱ्या अधिकाऱ्यांचीही होणार चौकशी

मुंबई: FDA Commissioner Tukaram Mundhe यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यात अवैध अन्नपदार्थ आणि औषध विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एफडीएने राज्यभरात राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ३ कोटी २७ लाख रुपयांचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त तुकाराम मुंडे यांनी, प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचे उत्पादन करण्यापासून ते थेट विक्री करणाऱ्या संघटित गुन्हेगारी नेटवर्कविरुद्ध ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

संघटित नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी ‘मकोका’चे अस्त्र

राज्यात गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्यांचे एक मोठे संघटित जाळे कार्यरत असल्याचे तपासात समोर आले आहे. या नेटवर्कला चाप लावण्यासाठी आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कडक आदेश दिले आहेत. पात्र प्रकरणांमध्ये थेट ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९’ (मकोका – MCOCA) लागू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. “हा नियम उत्पादकापासून ते किरकोळ विक्रेत्यापर्यंत सगळ्यांनाच लागू असेल आणि आरोपींचा पूर्वेतिहास पाहून ही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

संशयाच्या भोवऱ्यातील अधिकाऱ्यांवरही होणार कठोर कारवाई

राज्यातील या अवैध गुटखा विक्रीच्या मोठ्या रॅकेटमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाचेच काही अधिकारी सामील असल्याचे गंभीर आरोप केले जात आहेत. यावर बोलताना आयुक्त मुंडे यांनी विभागांतर्गत भ्रष्टाचारावर कडक बोट ठेवले. “या रॅकेटमध्ये आमच्या विभागातील काही अधिकारी इनव्हॉल्व्ह असल्याच्या आरोपांची आम्ही सखोल चौकशी करत आहोत. या चौकशीत जर कोणीही अधिकारी दोषी किंवा सहभागी असल्याचे आढळले, तर त्यांच्यावरही कसलीही गय न करता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा सज्जड दम त्यांनी दिला आहे.

वृत्तपत्रात खाद्यपदार्थ गुंडाळण्यास यापूर्वीच बंदी

आपल्या शिस्तप्रिय आणि धडक कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंडे यांनी यापूर्वीच नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यातील हॉटेल्स, टपऱ्या आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना कोणतेही अन्नपदार्थ वर्तमानपत्रात (वृत्तपत्रात) गुंडाळून न विकण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. त्यानंतर आता थेट गुटखा माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांनी ‘मकोका’ अस्त्र काढल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 13-06-2026