Rohit Pawar: आमदार रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हे गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करत होते.

रविवारी अखेर मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी जात रोहित पवारांची भेट घेतली. चर्चेनंतर आणि राज्य सरकारच्या सकारात्मक आश्वासनानंतर रोहित पवारांनी आपले उपोषण मागे घेत आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे.

आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवारांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन महाजनांकडे दिले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री गिरीश महाजन यांनी थेट रोहित पवारांसमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवल्यानंतर रोहित पवारांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.

२२ जून आधी मुंबईत बैठक

Tata punch

उपोषण मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, ” २२ जून रोजी राज्य सरकारचे अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक होणार असून, मुख्यमंत्र्यांनी स्वतः चर्चेसाठी बोलावले आहे. ३० जूनपासून कर्जमाफी लागू होणार असून, जे काही बदल करायचे आहेत ते ३० जूनपूर्वी केले जातील.”

मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या या उच्चस्तरीय बैठकीत केवळ राजकीय नेते नाही, तर राज्यातील प्रमुख शेतकरी नेतेही उपस्थित राहणार आहेत. यात राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर, ठाकरे गटाचे नेते, शेकापचे जयंत पाटील आणि महादेव जानकर या सर्व नेत्यांचा समावेश असेल, अशी माहिती रोहित पवारांनी दिली.

सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यास सकारात्मक आहे. मात्र, कर्जमाफीच्या जाचक अटी संदर्भात काय काय शिथिलता आणता येईल, यासाठी आपल्याला नियुक्त केलेल्या कमिटीकडे जावे लागेल, असे महाजन यांनी सांगितल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केले.

“आमची बैठक ठरली आहे. यात कोणतेही राजकारण नसून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, हीच आमची भूमिका आहे,” असे रोहित पवारांनी स्पष्ट केले. मात्र, सरकारने मागण्या मान्य कराव्यात यासाठी दबाव गट म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने ४ जुलै रोजी एक मोठे आंदोलन केले जाईल, अशी घोषणाही रोहित पवारांनी यावेळी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 15-06-2026