वडिलांच्या डोक्यात मारली खुर्ची
दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील करंजाणी कातळवाडी येथे कौटुंबिक वादातून एका मुलाने आपल्या वृद्ध माता-पित्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वडिलांनी दुसरा विवाह केल्याच्या रागातून दारूच्या नशेत धुंद असलेल्या मुलाने हे कृत्य केले. या हिंसक घटनेत वृद्ध पिता जखमी झाले असून, याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आरोपी मुलावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या रागातून घरात वाद
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १३ जून रोजी सायंकाळी ७.३० ते ८.०० वाजण्याच्या सुमारास करंजाणी कातळवाडी येथे घडली. फिर्यादी सुरेश श्रीपद आग्रे (वय ६७) हे आपली पत्नी सुरेखा यांच्यासोबत घरात असताना, त्यांचा ३७ वर्षीय मुलगा सुरेंद्र सुरेश आग्रे हा दारूच्या नशेत घरी आला. वडील सुरेश यांनी दुसरा विवाह केला असल्याचा राग सुरेंद्रच्या मनात होता. याच कारणावरून त्याने घरात प्रवेश करताच वृद्ध माता-पित्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
आईला धक्काबुकी अन् मध्यस्थी करणाऱ्या पित्याच्या डोक्यात खुर्चीचा प्रहार
काही वेळातच या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. आरोपी सुरेंद्र याने प्रथम आपली आई सुरेखा यांना अश्लील शिवीगाळ करत धक्काबुकी करण्यास सुरुवात केली. पत्नीला होणारी मारहाण पाहून भांडण सोडवण्यासाठी वृद्ध पिता सुरेश आग्रे मध्ये पडले. मात्र, संतप्त झालेल्या सुरेंद्रने वडिलांनाही धक्काबुकी करत हाताच्या थापटांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्याने घरातील फायबरची खुर्ची उचलून थेट वडिलांच्या डोक्यात मारली. या खुर्चीच्या प्रहारामुळे सुरेश आग्रे हे गंभीर जखमी झाले.
मध्यरात्री दापोली पोलीस ठाण्यात तक्रार; नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल
या घरात झालेल्या मारहाणीनंतर जखमी पिता सुरेश आग्रे यांनी १४ जून रोजी पहाटे २.२९ वाजता दापोली पोलीस ठाणे गाठून मुलाविराधात रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे दापोली पोलिसांनी तत्परतेने पावले उचलत आरोपी मुलगा सुरेंद्र सुरेश आग्रे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ११५(२) सह भारतीय दंड संहिता (IPC) कलम ३२४, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 16-06-2026














