रत्नागिरीत गणवेशासाठी मिळाला तोकडा निधी !

प्रतिविद्यार्थी ३०० रुपयांऐवजी केवळ २४० रुपये प्राप्त; जिल्ह्यात अजूनही ७८ हजारांहून अधिक पुस्तकांची प्रतीक्षा

रत्नागिरी:

रत्नागिरीत मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीवरून शिक्षण वर्तुळात तीव्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य शासनाने या वर्षापासून लागू केलेल्या नवीन निकषानुसार, पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेशांसाठी प्रतिविद्यार्थी ६०० रुपये प्रमाणे निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात पहिल्या एका गणवेशासाठीही केवळ २४० रुपयांनुसारच निधी वितरित करण्यात आला आहे. शासनाकडून पहिल्या गणवेशासाठी ठरवलेल्या ३०० रुपयांच्या दरातही ६० रुपयांची कपात झाल्यामुळे, मिळालेल्या तोकड्या निधीत दुसरा गणवेश कसा द्यावा, असा गंभीर प्रश्न आता जिल्ह्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांसमोर उभा ठाकला आहे.

६० हजारहून अधिक विद्यार्थी निधीच्या प्रतीक्षेत

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियान आणि राज्य शासनाच्या वतीने इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व पात्र मुली, अनुसूचित जाती-जमातीमधील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या पाल्यांना या मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जातो. यंदा रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६० हजार ४७६ विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. नवीन नियमानुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देणे बंधनकारक असल्याने प्रशासनाने पहिला गणवेश विद्यार्थ्यांना वितरित केला आहे. मात्र, या पहिल्या गणवेशासाठी १ कोटी ४५ लाख १४ हजार २४० रुपये प्राप्त झाले असून, प्रतिविद्यार्थी ६०० रुपयांपैकी केवळ २४० रुपयेच मिळाल्याने अद्याप मोठा निधी येणे बाकी आहे.

लाखो रुपयांचा निधी अद्याप थकीत

नियोजनानुसार पहिल्या गणवेशासाठी ३०० रुपये अपेक्षित असताना २४० रुपये आले आहेत. यामुळे पहिल्याच गणवेशाचे उर्वरित ६० रुपयांप्रमाणे एकूण ३६ लाख २८ हजार ५६० रुपये अद्याप शासनाकडून मिळालेले नाहीत. याशिवाय, दुसऱ्या संपूर्ण गणवेशाची रक्कमही अद्याप जमा झालेली नाही. त्यामुळे शासन उर्वरित थकीत रक्कम पाठवणार की आहे त्याच पैशात दोन्ही गणवेशांची जुळवाजुळव करावी लागणार, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिणामी, दुसऱ्या गणवेशासाठी विद्यार्थ्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Tata motars

पाच लाख पुस्तकांचे वाटप; ७८ हजार पुस्तके अद्याप अपूर्ण

दुसरीकडे, शालेय पुस्तकांच्या वितरणातही जिल्ह्यात तफावत दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण ५ लाख ८६ हजार ३४० पुस्तके मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी ५ लाख ७ हजार ४२४ पुस्तके शिक्षण विभागाला प्राप्त झाली असून, त्यांचे वाटप शाळेच्या पहिल्याच दिवशी करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८६.५४ टक्के पुस्तकांचे यशस्वी वितरण झाले असले, तरी उर्वरित ७८ हजार ९१६ पुस्तके अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. ही प्रलंबित पुस्तके लवकरच प्राप्त होतील आणि त्यानंतर त्यांचे तातडीने वाटप केले जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 17-06-2026