Ratnagiri ZP Schools Condition: रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ जिल्हा परिषद शाळा धोकादायक; १२५ शाळा अजूनही दुरुस्तीविना

पावसाळा सुरू होऊनही दुरुस्तीची कामे अपूर्ण; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

रत्नागिरी:

Ratnagiri ZP Schools Condition च्या संदर्भाने रत्नागिरी जिल्ह्यातून एक अत्यंत चिंताजनक आणि गंभीर वृत्त समोर आले आहे. जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाला असून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात देखील झाली आहे, मात्र अद्याप जिल्ह्यातील शाळांच्या दुरुस्तीचे आणि बांधकामाचे काम पूर्ण झालेले नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल १२५ शाळा सद्यस्थितीत दुरुस्तीविना नादुरुस्त आहेत. यापैकी ६५ शाळा अत्यंत अतिधोकादायक अवस्थेत असूनही, योग्य दुरुस्तीविना याच धोकादायक शाळांमधून विद्यार्थ्यांचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात विद्यार्थ्यांना छत्री धरून, दप्तर सांभाळत किंवा भिजतच शिक्षण घेण्याची वेळ आली असून, “जिल्हा परिषद शाळांकडे कोणी लक्ष देता का?” अशी आर्त हाक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमधून दिली जात आहे.

आचारसंहिता आणि निधीअभावी कामे रखडली; प्रस्ताव पालकमंत्र्यांकडे

एकीकडे ग्रामीण भागातील शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांना वाड्यावाड्यांवर फिरावे लागत असताना, दुसरीकडे मात्र शाळांच्या इमारतींची दुरवस्था कायम आहे. वादळी वारा आणि पावसामुळे काही शाळांची पडझड झाली आहे, मात्र त्यांची तात्काळ दुरुस्ती होत नसल्याने पालक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि निधीचा अभाव यामुळे रखडलेली कामे आता आचारसंहिता संपूनही सुरू झालेली नाहीत. या १२५ नादुरुस्त शाळांच्या दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधीमधून मंजूर व्हावा, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठवला आहे. हा निधी मिळाल्यानंतरच खऱ्या अर्थाने कामांना वेग येणार आहे.

शाळा दुरुस्तीची संथ गती; काही तालुक्यांत कामे अपूर्ण

जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात २०२५-२६ या वर्षासाठी संगमेश्वर, रत्नागिरी, लांझा आणि राजापूर या तालुक्यांमधील शाळा दुरुस्तीची एकूण ४५ कामे मंजूर होती. त्यापैकी ३० कामे पूर्ण झाली असून १४ कामे अद्याप प्रगतिपथावर आहेत, तर एक काम रद्द करण्यात आले आहे. शाळांच्या नवीन बांधकामाचा विचार केला तर एकूण ३२ कामे मंजूर आहेत, ज्यापैकी केवळ ६ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामांपैकी १६ कामे प्रगतिपथावर आहेत, ८ कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, तर २ कामे निविदा स्तरावर रखडलेली आहेत. चिपळूण तालुक्यातही काही कामे पूर्ण झाली असून काही कामे अजूनही प्रगतिपथावर आहेत.

शिक्षण आणि बांधकाम विभागात माहिती देण्यास टोलवाटोलवी

पावसाचा जोर वाढणार असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही, जिल्हा प्रशासनाचा शिक्षण विभाग या समस्येकडे अद्याप गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडे शाळा दुरुस्ती आणि बांधकामाच्या कामांची सद्यस्थिती काय, याची माहिती विचारली असता, “माझ्याकडे माहिती नाही, बांधकाम विभागाकडे जा” असे उत्तर दिले जाते. तर दुसरीकडे बांधकाम विभाग “शिक्षण विभागाकडे जा” असे म्हणून हात झटकत आहे. अत्यंत महत्त्वाच्या आणि विद्यार्थ्यांच्या जिवाशी संबंधित असलेल्या या संवेदनशील विषयावर प्रशासकीय पातळीवर एवढी टोलवाटोलवी का केली जात आहे? असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:20 17-06-2026