Veer Devpat Road Tender: वीर-देवपाठ रस्ता कामासाठी अखेर निविदा जाहीर; जि. प. सदस्या शिवानी सावंत यांच्या पाठपुराव्याला यश

तब्बल अडीच कोटी मंजूर होऊनही ४ महिने लालफितीत अडकलेले काम; पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर बांधकाम विभाग अलर्ट

चिपळूण: Veer Devpat Road Tender | चिपळूण तालुक्यातील एका महत्त्वाच्या ग्रामीण रस्ते विकासाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही गेल्या ४ महिन्यांपासून प्रशासकीय लालफितीत अडकलेल्या वीर-देवपाठ रस्त्याबाबत जिल्हा परिषद सदस्या शिवानी सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग अलर्ट झाला आहे. प्रशासनाने खडबडून जागे होत या रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ७५ लाख रुपयांची निविदा जाहीर केली असून, यामुळे या भागातील रस्ता कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

अत्यंत दुर्गम भागातील १० किलोमीटरचा रस्ता

चिपळूण तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या वीर, रानपाट, लोहारवाडी, देवपाठ, पेढांबे, कळबुशी, नायशी आणि कोकरे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. या संपूर्ण १० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी फेब्रुवारी महिन्यात मंजूर करण्यात आला होता. या कामाला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देखील मिळाली होती.

तांत्रिक मान्यतेच्या तारखेत घोळ; कागदावरच राहिले काम

निधी आणि मंजुरी असूनही तांत्रिक मान्यतेच्या कागदपत्रांवर कोणतीही तारीख नमूद नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे निधी मंजूर होऊनही चक्क ४ महिने हा रस्ता केवळ कागदावरच राहिला. हा प्रशासकीय दिरंगाईचा प्रकार जिल्हा परिषद सदस्या शिवानी सावंत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी थेट रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे धाव घेऊन याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनंतर २४ तासांत कारवाई

पालकमंत्री उदय सामंत यांनी या विषयाची गंभीर दखल घेत योग्य शब्दांत संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले. पावसाळी हंगामात निविदा प्रसिद्ध करता येत नाही हे माहिती असतानाही प्रशासन दिरंगाई करत असल्याबाबत जाब विचारण्यात आला. पालकमंत्र्यांच्या या दणक्यानंतर प्रशासकीय यंत्रणा वेगाने हलली आणि गेल्या चार महिन्यांपासून रखडलेली ही प्रक्रिया अवघ्या २४ तासांत पूर्ण करून १ कोटी ७५ लाख रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली. पावसाळा धरून १२ महिने या कामाची मुदत देण्यात आली आहे.

केवळ निविदा नव्हे, प्रत्यक्ष दर्जेदार कामासाठी पाठपुरावा करणार

“निविदा जाहीर करून काम संपले या भ्रमात प्रशासनाने राहू नये,” असा स्पष्ट इशारा जि. प. सदस्या शिवानी सावंत यांनी दिला आहे. केवळ कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण न करता, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन ते संपेपर्यंत आपण या कामाचा निरंतर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील हा रस्ता दर्जेदार होण्यासाठी तज्ज्ञमंडळींसह आपण स्वतः कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:40 22-06-2026