Chiplun Cyber Fraud: चिपळुणात स्पेअर पार्ट व्यावसायिकाची १० लाख २० हजारांची ऑनलाईन फसवणूक

फ्रॅन्चायजी देण्याच्या बहाण्याने बँक खात्यातून रक्कम केली लंपास; दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल

चिपळूण: शहरातील खेर्डी बाजारपेठ येथील एका नामांकित स्पेअर पार्ट व्यावसायिकाची तब्बल १० लाख २० हजार १७४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक (Chiplun Cyber Fraud) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपनीची फ्रॅन्चायजी देण्याच्या नावाखाली हा मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून, या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी संशयित आरोपी अभय महाजन व प्रियांका सिंग या दोन अनोळखी व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

५ मे ते २५ जून दरम्यान घडली घटना

चिपळूण पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ऑनलाईन फसवणुकीची ही साखळी ५ मे २०२६ ते २५ जून २०२६ या कालावधीत घडली. खेर्डी बाजारपेठ येथील रहिवासी आणि स्पेअर पार्ट व्यावसायिक कौस्तुभ अविनाश अभ्यंकर यांनी या संदर्भात चिपळूण पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. संशयित आरोपींनी अभ्यंकर यांच्याशी संपर्क साधून एका नामांकित कंपनीची फ्रॅन्चायजी देण्याचे आमिष दाखवले होते.

बनावट माहिती देऊन बँक खात्यावर मागवले पैसे

आरोपी अभय महाजन आणि प्रियांका सिंग यांनी फिर्यादी कौस्तुभ अभ्यंकर यांना फ्रॅन्चायजी संदर्भात ऑनलाईन माध्यमातून विविध खोटी आणि बनावट माहिती पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. कंपनीची फ्रॅन्चायजी मिळण्याच्या आशेने अभ्यंकर यांनी आरोपींनी सांगितलेल्या इंडियन ओव्हरसिज बँकेच्या अकाऊंटमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांत एकूण १० लाख २० हजार १७४ रूपये ट्रान्सफर केले.

फ्रॅन्चायजी नाही अन् पैसेही गेले; पोलिसांत धाव

मोठी रक्कम बँक खात्यावर वर्ग केल्यानंतरही संशयित आरोपींकडून कोणतीच फ्रॅन्चायजी देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. रक्कम मिळाल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आणि मूळ रक्कमही परत केली नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कौस्तुभ अभ्यंकर यांनी तात्काळ चिपळूण पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस आता सायबर सेलच्या मदतीने पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 27-06-2026