गावाचा विकास स्वच्छतेवरच अवलंबून: मिरजोळेत वृक्षारोपण प्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे प्रतिपादन

गावाचा विकास स्वच्छतेवरच अवलंबून: मिरजोळेत वृक्षारोपण प्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे प्रतिपादन

सेवा संकल्प अभियानांतर्गत मिरजोळे ग्रामपंचायतीत कार्यक्रम; कचरा विलगीकरण आणि आरोग्य संरक्षणावर विशेष भर

रत्नागिरी:

गावाचा विकास हा केवळ सुंदर आणि मोठ्या इमारतींनी होत नसून, गावातील लोकांचे आरोग्य आणि मुलांचे उज्ज्वल भविष्य हे संपूर्णपणे स्वच्छतेवरच अवलंबून असते, असे प्रतिपादन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले. सेवा संकल्प अभियानांतर्गत मिरजोळे समूह ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.

Rotery school

शाळा प्रवेशाचे दाखले आणि नोंदवह्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

tata motars

या कार्यक्रमादरम्यान सेवाकेंद्रातून नागरिकांना मिळणारे विविध दाखले, विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांचे वितरण तसेच ग्रामपंचायतीच्या नोंदवह्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत बारकाईने पाहणी केली. सेवाकेंद्राच्या कामकाजाबद्दल त्यांनी पूर्ण समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पंचायत समिती सभापती प्रविण पांचाळ, सरपंच रत्नदीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा गावडे, पंचायत समिती सदस्य वैभव पाटील, उपसरपंच राहुल पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि गटविकास अधिकारी उमेश गावधडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

अस्वच्छता आणि प्रदूषणामुळे वाढता कॅन्सरचा धोका

उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी स्वच्छतेच्या मुद्द्यावर विशेष भर दिला. ते म्हणाले, गावांमध्ये निर्माण होणारा कचरा, प्लास्टिक, कीटकनाशके आणि अस्वच्छता थेट मानवी अन्नात आणि पाण्यात मिसळत आहे. आज गावागावांत कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असून, त्याचे मुख्य कारण वाढती अस्वच्छता आणि प्रदूषण हेच आहे. निधी आणि संसाधनांची मर्यादा असली तरी उपलब्ध साधनांचा वापर करून योग्य नियोजनाद्वारे नागरिकांना कचरा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे ही काळाची गरज बनली आहे.

प्रभावी कचरा विलगीकरणाचे आवाहन

एमआयडीसी क्षेत्र आणि झपाट्याने नागरीकरण होणाऱ्या भागांत कचरा तसेच सांडपाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. यासाठी घंटागाडीचे योग्य नियोजन करून कचरा विलगीकरण प्रभावीपणे राबवले पाहिजे, असे सांगत गावातील आरोग्य राखण्यासाठी पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.