Gadnadi Dam Updates: गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

संगमेश्वर: रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा मध्यम पाटबंधारे प्रकल्प असलेले आणि येथील बळीराजासाठी वरदान ठरलेले ‘गडनदी धरण’ पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजता हे धरण ओव्हरफ्लो होऊन भरून वाहू लागले आहे. धरण पूर्ण भरल्याने सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी नदीपात्रात सोडले जात असून, चिपळूणच्या पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

Gadnadi Dam Updates: धरण क्षेत्रातील पाणीपातळी आणि उपयुक्त पाणीसाठ्याची आकडेवारी

पाटबंधारे विभागाने ५ जुलै २०२६ रोजी केलेल्या अधिकृत नोंदणीनुसार, गडनदी धरण क्षेत्रातील सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:

  • एकून पाणी पातळी: धरणाची एकूण पाणी पातळी सध्या १२२.२० मीटर इतकी आहे. ६ जुलै रोजी सकाळी धरण भरून वाहू लागले तेव्हा ही पातळी १२१.२० मीटरवर होती.
  • एकूण पाणीसाठा: ६६.८५१३ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.).
  • उपयुक्त पाणीसाठा: ६६.५३९३ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.).
  • पाणी विसर्ग: सांडव्यावरील विसर्ग १२६५४२ क्युसेक्स असून विमोचकातून सोडलेले पाणी ०.०० क्युसेक्स आहे. सध्या सांडव्यावरून १.३१५ क्युसेक्स इतके पाणी थेट नदीपात्रात वाहत आहे.

२४ तासांत १०३ मिमी पाऊस; एकूण पर्जन्यमान हजाराच्या उंबरठ्यावर

गडनदी धरण क्षेत्रात पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. दि. ५ ते ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत येथे तब्बल १०३.०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे चालू हंगामात आतापर्यंत गडनदी धरण क्षेत्रात झालेला एकूण पाऊस ९९४.०० मिलीमीटरवर पोहोचला आहे.

शेतकरी व नागरिकांना प्रशासनाचे आवाहन; सांडव्याच्या प्रवाहात उतरू नका

नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत असल्यामुळे पाटबंधारे विभागाने स्थानिक नागरिकांसाठी व आपत्कालीन सुरक्षेसाठी विशेष नियमावली आणि आवाहने केली आहेत:

१. शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरू नये: पावसाचा आणि पाण्याचा जोर कायम असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःसह आपल्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी आणि कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये. २. पर्यटकांना सक्त ताकीद: सध्या पावसाळी पर्यटनासाठी गडनदी धरण पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढू शकते. मात्र, धरणाच्या सांडव्याच्या पाणीप्रवाहात शिरण्याचा किंवा पाण्यात उतरण्याचा अतिउत्साही प्रयत्न कोणीही करू नये. नागरिकांनी स्वतःहून आपली खबरदारी बाळगावी, असे आवाहन चिपळूणच्या पाटबंधारे विभागाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:16 07-07-2026