NCMC Card Ratnagiri: १ सप्टेंबरपासून एसटीच्या सवलतींसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य! रत्नागिरीत १ लाख प्रवाशांना कार्डचे वाटप पूर्ण

एनसीएमसी कार्ड नोंदणीची ३१ ऑगस्ट अंतिम मुदत

रत्नागिरी :

एसटी महामंडळाच्या विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC Smart Card) १ सप्टेंबरपासून अनिवार्य करण्यात आले आहे. १ सप्टेंबरनंतर हे कार्ड नसणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या प्रवास सवलतीचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे ३१ ऑगस्टपूर्वी सवलतधारकांनी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढून घेणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा सवलतीऐवजी प्रवाशांना १०० टक्के तिकिटाचे पैसे द्यावे लागतील.

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २ लाख प्रवाशांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. त्यापैकी १ लाखांहून अधिक प्रवाशांना कार्डचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तिकीट व्यवहारात पारदर्शकता आणि सुलभता

डिजिटल तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी एसटी महामंडळाने ही नवीन व्यवस्था अंमलात आणली आहे. या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांची पात्रता आणि त्यांना मिळणाऱ्या सवलतींचा लाभ थेट डिजिटल पद्धतीने नोंदवला जाणार आहे. भविष्यात एसटीचा तिकीट व्यवहार अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

जिल्ह्यात १०० हून अधिक एजंट; बसस्थानकांवर गर्दी

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि स्मार्ट कार्ड नोंदणी सुलभ व्हावी यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात १०० हून अधिक एजंटांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवाशांना केवळ १९९ रुपये शुल्कात हे एनसीएमसी स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे.

दरम्यान, ३१ ऑगस्टची मुदत जवळ येत असल्याने रत्नागिरी मुख्य बसस्थानकासह लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण आणि गुहागर या सर्व प्रमुख बसस्थानकांवर स्मार्ट कार्ड काढण्यासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सवलतधारकांनी शेवटच्या क्षणाची घाई टाळून वेळेत आपले कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:03 24-08-2026