मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कर्जमाफीचा दुसरा हप्ता जाहीर; क्रीडा बक्षीस धोरणातही मोठी सुधारणा
मुंबई :
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीतूनच राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा करण्यात आली असून, शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता अधिकृतपणे जारी करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण ५ हजार ८६ कोटी रुपयांची रक्कम थेट वितरित करण्यात आली आहे.
कर्जमाफीच्या या मोठ्या निर्णयासोबतच राज्य मंत्रिमंडळाने क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण, महसूल आणि विधि व न्याय या चार महत्त्वाच्या विभागांच्या अंतर्गत ४ मोठे प्रशासकीय निर्णय घेतले आहेत. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांसाठीच्या रोख बक्षीस धोरणात व्यापक सुधारणा करण्याचा समावेश आहे.
नागपूर व अहिल्यानगरमध्ये नवीन विद्यापीठांना मंजुरी
उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत शिक्षण क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नागपूर येथे लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच अहिल्यानगर येथे ‘डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ’ स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे. या खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकशास्त्र (Medical), दंतवैद्यक (Dental), फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.
जत नगरपरिषद इमारत आणि निफाड येथे नवीन न्यायालय
प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेला प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी मौजे जत येथील २५८५ चौरस मीटर शासकीय जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
तसेच विधि व न्याय विभागाच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (तालुका निफाड) येथे ‘दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर’ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या नवीन न्यायालयासाठी आवश्यक असलेली पदे आणि त्याशी संबंधित खर्चाच्या तरतुदीला मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:36 24-08-2026














