महावॉकेथॉन रत्नागिरी उपक्रमातून ऐतिहासिक जयस्तंभ चौकात जलजागृतीचा एल्गार
रत्नागिरी :
जलसंधारण दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी शहर आणि परिसरात जलजागृतीचा मोठा संदेश देणारी ‘महावॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ ही पदयात्रा अत्यंत उत्साहात पार पडली. ‘पाण्याचा प्रत्येक थेंब जपू या, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवू या’, असा दृढ संकल्प करत हजारो रत्नागिरीकरांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या तीन किलोमीटरच्या पदयात्रेत विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ऐतिहासिक जयस्तंभ चौकात सकाळी सर्व सहभागी घटकांनी एकत्र येत सर्वप्रथम जलसंधारणाची सामूहिक शपथ घेतली. यानंतर रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आणि मृद् व जल संधारण विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय साहुत्रे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला औपचारिक प्रारंभ करण्यात आला.
जयस्तंभ चौक ते माळनाका मार्गावर जलजागृतीचा संदेश
ही महावॉकेथॉन शहराच्या मध्यवर्ती भागातून काढण्यात आली. जयस्तंभ चौक येथून सुरू झालेली पदयात्रा माळनाका मार्गे पुन्हा जयस्तंभ चौकात येऊन संपन्न झाली. पदयात्रेदरम्यान विद्यार्थ्यांनी पाणी बचत आणि जलसंधारणाचे महत्त्व पटवून देणारे फलक हातात धरले होते. संपूर्ण मार्गावर पाण्याचा अपव्यय टाळणे, भूजल पातळी वाढवणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना प्रशासनाच्या वतीने प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. पाणी संवर्धनाची ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचा संदेश या प्रसंगी उपस्थितांना देण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:41 24-08-2026














