पावसाची विश्रांती; भात लावणीची कामे रखडली

रत्नागिरी: शेती संदर्भातील एक महत्त्वाची चिंताजनक माहिती समोर येत आहे. तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मान्सूनने अचानक विश्रांती घेतल्यामुळे खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या भात लावणीची कामे पूर्णपणे रखडली आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर शेतीकामांना वेग आला होता, मात्र ऐन लावणीच्या हंगामात पावसाने ओढ दिल्याने बळीराजासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पुढील दोन-तील दिवसांत पाऊस न परतल्यास अपूर्ण राहिलेली लावणीची कामे खोळंबण्याची भीती निर्माण झाली आहे.

यंदाच्या मान्सून हंगामाची सुरुवात सुरुवातीपासूनच लहरी राहिली आहे. गतवर्षी मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनचे वेळेत आगमन झाले होते आणि मे-जून दरम्यान पावसाने सातत्य ठेवून नियोजित वेळेत सरासरी गाठली होती. याउलट, यंदा मे महिन्यापासून ते जूनचा पहिला पंधरवडा पूर्णपणे कोरडा गेला, ज्यामुळे रोहिणी नक्षत्रातील पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना पावसाची दीर्घप्रतीक्षा करावी लागली होती. त्या काळात काही शेतकऱ्यांनी शेतीजवळील उपलब्ध पानवठ्यांचा आणि कृत्रिम पाण्याचा वापर करून कशीबशी रोपे जगवली होती.

जुलैच्या सुरुवातीला दमदार हजेरी, आता पुन्हा खंड
जूनच्या शेवटच्या टप्प्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर आणि जुलैच्या पहिल्या १० दिवसांत झालेल्या मुसळधार सरमांमुळे शेतकरी वर्ग सुखावला होता. ज्या शेतकऱ्यांनी कृत्रिम पाण्यावर रोपे जगवली होती, त्यांना जुलैच्या पहिल्या टप्प्यातील पावसामुळे भात लावणीची नामी संधी मिळाली आणि मागील आठवड्यात लावणीच्या कामाने मोठा वेग घेतला होता. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पावसाने अचानक ब्रेक घेतल्याने अनेक शेतकऱ्यांची लावणी अपूर्ण राहिली असून शेतात कामाचा खंड पडला आहे.

हवामानाच्या या विचित्र बदलामुळे चालू वर्षी एक आगळीवेगळी स्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षीच्या मान्सून हंगामात मे आणि जून अशा दोन महिन्यांच्या कालावधीत पडणारा सरासरी पाऊस, यावर्षी जून अखेर ते जुलैच्या पहिल्या पंधरवड्या दरम्यान अवघ्या १० ते १२ दिवसांत कोसळला आहे. आकड्यांच्या दृष्टीकेनातून पावसाचा सरासरी टप्पा पूर्ण झाला असला, तरी शेतीसाठी अत्यंत आवश्यक असणारा रोजचा सातत्यपूर्ण पाऊस सध्या गायब असल्याने बळीराजा चिंतेत असून पुन्हा एकदा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:32 13-07-2026