रत्नागिरी : कृषी उत्पादनाची आकडेवारी ऑनलाईन नोंदवणार

रत्नागिरी : चालू खरीप हंगामामध्ये झालेले पर्जन्यमान, परतीचा पाऊस आणि अवकाळी पाऊस तसेच अन्य कारणामुळे भात व नागली पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी उत्पादनाची अचूक आकडेवारी मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन नोंदवायची आहे. गावामध्ये राबवण्यात येणाऱ्या पीक कापणी प्रयोगासाठी ग्राम पातळीवरील समिती प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४ ते रब्बी हंगाम २०२५-२६ हंगामासाठी तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तथापि, सर्वसमावेशक पीक विमा योजना राज्यात राबवली जात आहे. या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भात व नागली या दोन पिकांकरिता विमा संरक्षण लागू आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान यामुळे सरासरी उत्पादनात घट झाल्यास विमा संरक्षण दिले जाते.

या योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये भात व नागली या पिकांची सरासरी उत्पादकतेची परिगणना करण्यासाठी प्रत्येक पिकासाठी महसूल मंडल स्तरावर कृषी, महसूल व जिल्हा परिषदेमार्फत पीक कापणी प्रयोगांचे नियोजन करण्यात आले आहे. पारदर्शक पद्धतीने पिकांच्या उत्पादनाची अचूक आकडेवारी प्राप्त करण्याच्या उद्देशाने पीक कापणी प्रयोगांचे केंद्र शासनाच्या मोबाईल अॅपद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 06/Nov/2024

Arihant 3