Ratnagiri ST Bus Misbehavior: चालक-वाहकाने विद्यार्थिनींना बसमधून दरडावत खाली उतरवले; नाणीज येथील संतापजनक प्रकार

कायदेशीर पास असूनही पैशांची मागणी; मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी


रत्नागिरी:
Ratnagiri ST Bus Misbehavior | रत्नागिरी तालुक्यातील नाणीज बस स्थानकावर एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. घरी जाण्यासाठी एसटी बसमध्ये प्रवेश करणाऱ्या शाळकरी छोट्या विद्यार्थिनींना कायदेशीर पास नाकारत, चालक आणि वाहकाने आधी पैशांची मागणी केली. विद्यार्थिनींनी विरोध केला असता, त्यांना उमटपणे बोलून आणि दरडावून चालत्या बसमधून खाली उतरवल्याची घटना घडली आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरात तीव्र नाराजी पसरली असून, दोषी एसटी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

पास असूनही तिकीटाच्या पैशांसाठी दमदाटी
या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, नाणीज पंचक्रोशी शिक्षणोत्तेजक मंडळ संचलित नाणीज येथील माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये पंचक्रोशीतील खानू, कशेळी, करंजारी, घाटीवळे, देवळे या ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. ११ जुलै रोजी दुपारी १ वाजता लांझा आगाराची पाली-घाटीवळे ही बस नाणीज बस थांब्याजवळ थांबली होती. त्यावेळी शाळेतील चार छोट्या विद्यार्थिनींनी घरी जाण्यासाठी बसमध्ये प्रवेश केला.

बसमध्ये चढताच चालक आणि वाहकाने “तुम्ही शाळेच्या स्टॉपजवळ का थांबला नाहीत, या स्टॉपवर का आलात?” अशी विनाकारण विचारणा करत विद्यार्थिनींवर डाफरण्यास सुरुवात केली. या विद्यार्थिनींकडे शासनाने दिलेला अधिकृत प्रवासाचा पास असतानाही, चालक-वाहकांनी तो पास मान्य करण्यास नकार दिला आणि तिकीटाच्या पैशांची मागणी केली.

घाबरलेल्या विद्यार्थिनींना थांब्यावरच सोडले
वाहकाने तिकीटाचे पैसे मागितल्यानंतर विद्यार्थिनींनी पास असल्याचे सांगितले. मात्र, नियमांना केराची टोपली दाखवत चालक व वाहकाने अत्यंत उद्धट भाषेत दमदाटी करून या छोट्या विद्यार्थिनींना बसमधून खाली उतरवले आणि बस पुढे निघून गेली. एसटी कर्मचाऱ्यांच्या या अचानक झालेल्या आक्रमक आणि मुजोर वागणुकीमुळे शाळकरी मुली प्रचंड घाबरल्या. त्या काही वेळ बस थांब्यावरच रडत राहिल्या आणि नंतर कशाबशा घरी पोहोचल्या. त्यांनी घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला.

लांजा आगाराकडे तक्रार; भाजप युवा मोर्चासह पालकांचे विभाग नियंत्रकांना निवेदन
या मुजोर वाहकाकडून यापूर्वीही अनेकदा प्रवाशांशी आणि विद्यार्थ्यांशी अशाच पद्धतीची गैरवर्तणूक झाल्याचे पालकांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर, संतप्त पालकांनी लांजा आगाराला लेखी निवेदन देऊन या मुजोर चालक व वाहकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर पूजा बोडेकर, संदेश मावळणकर, प्रकाश गोरे, विक्रांत शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तसेच, या गंभीर प्रकरणाची दखल घेत भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष चिराग खटकूळ व स्थानिक पालकांनी रत्नागिरी येथील एसटी विभाग नियंत्रकांची भेट घेऊन त्यांना थेट निवेदन सादर केले असून, संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 15-07-2026