चिपळूण : बहादूरशेख चौक येथील गर्डर चढवण्याचे काम सुरू; गणेशोत्सवापूर्वी उड्डाणपूल सुरू करण्याचे उद्दिष्ट

भर पावसात महामार्गावरील वाहतूक थांबवून क्रेनच्या सहाय्याने गर्डर पिलरवर बसवले; कामाला गती देण्याचा प्रयत्न

चिपळूणातील बहादूरशेख चौकात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत सुरू असलेल्या उड्डाण पुलाचे गर्डर चढवण्याचे महत्त्वाचे काम भर पावसात सुरू करण्यात आले आहे. दीर्घकाळापासून अर्धवट राहिलेल्या या पुलाच्या पूर्णत्वासाठी स्थानिक नागरिक आणि वाहनचालक सातत्याने विचारणा करत होते. रविवारी सायंकाळी आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवून क्रेनच्या सहाय्याने दोन महाकाय गर्डर पिलरवर यशस्वीरीत्या बसवण्यात आले आहेत.

पोलीस बंदोबस्तात बॅरिकेट्स लावून काम पूर्ण

शहरातील मुंबई-गोवा महामार्ग आणि गुहागर-विजापूर मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा आणि गजबजलेला चौक म्हणून बहादूरशेख चौक ओळखला जातो. या मुख्य चौकातील काम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरक्षिततेचा उपाय म्हणून आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहतूक नियंत्रित करण्यात आली होती.

उड्डाणपुलाचे काम ७० टक्क्यांहून अधिक पूर्ण

प्राप्त माहितीनुसार, या उड्डाण पुलाचे काम आता ७० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. येत्या ऑगस्टअखेरपर्यंत उड्डाण पुलावरील सर्व गर्डर बसवून काँक्रीटीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आगामी गणेशोत्सवापूर्वी या पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

पूर्वीच्या दुर्घटनेची पार्श्वभूमी आणि दिरंगाईबाबत शंका

सुमारे दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी निर्माणाधीन असलेला पूल अचानक कोसळला होता. आमदार शेखर निकम, काही अधिकारी व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह पुलाची पाहणी करत असतानाच ही दुर्घटना घडली होती, मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला होता. या दुर्घटनेनंतर चिपळूणच्या उड्डाण पिलरनंतर कराड येथील उड्डाण पूल कोसळला होता आणि तिथे सहापदरी उड्डाण पूल तयारही झाला, परंतु चिपळूणातील उड्डाण पुलाच्या कामाला अपेक्षित गती मिळाली नव्हती.

राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी यांच्याकडून या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी हा उड्डाण पूल खरोखरच वाहतुकीसाठी खुला होईल की नाही, याबाबत नागरिकांमधून अद्याप शंका उपस्थित केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 21-07-2026