CJP NEET Protest Delhi: दिल्लीत इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद! Metro स्टेशन बंद

जंतरमंतरवरील आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेनंतर राजधानीत अलर्ट, थेट संसदेवर मोर्चा नेण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

CJP NEET Protest Delhi: नवी दिल्ली :

नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र आणि आक्रमक होत चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान, बुधवारी रात्री आंदोलकांनी पोलिसांना लक्ष्य करत अचानक हल्ला केला, ज्यामध्ये काही पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण दिल्लीत पोलीस प्रशासन आणि इतर यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.

संसदेवर मोर्चाचा प्रयत्न आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ

सध्या देशाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने संसद भवन परिसरात आधीच कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशातच आंदोलकांनी थेट संसदेवर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक ठाम असून, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांच्या निवासाची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.

फास्ट-ट्रॅक कोर्टाच्या घोषणेनंतरही राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक ठाम

नीट पेपरफुटीचे हे संपूर्ण प्रकरण ‘फास्ट-ट्रॅक कोर्टा’त चालवले जाईल आणि दोषींना लवकरात लवकर शिक्षा दिली जाईल, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. मात्र, कॉकरोच जनता पार्टी या घोषणेने शांत झालेली नाही. कोणत्याही परिस्थितीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवाच, या एकाच मागणीवर आंदोलक अडून बसले आहेत.

मेट्रो स्टेशन्स बंद आणि दिल्लीत इंटरनेट सेवा खंडित

जंतरमंतरवर आंदोलकांची गर्दी सतत वाढत असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील काही मेट्रो स्टेशन्स बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच, पाकिस्तानच्या काही सोशल मीडिया अकाऊंटवरून तरुणांची माथी भडकवणारे व्हिडिओ व्हायरल केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. कोणत्याही प्रकारचे भडकाऊ भाषण किंवा व्हिडिओ प्रसारित होऊ नयेत आणि शांतता कायम राहावी, यासाठी दिल्लीतील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

आंदोलनातील वक्तव्यांवरून गंभीर प्रश्न

या आंदोलनादरम्यान पोलिसांवर थेट हल्ले करण्यात आले असून त्यासंबंधीचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. याशिवाय, आंदोलनातील काही घटकांकडून बांगलादेशातील परिस्थितीचा उल्लेख करत वादग्रस्त विधाने केली जात असल्याने या आंदोलनाच्या स्वरूपावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देशातील इतर अनेक शहरांतही या आंदोलनाचे पडसाद उमटत असून सरकारवर शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 23-07-2026