२४ जुलैला शिवतीर्थावर राष्ट्रगीत गायनाचे आदित्य ठाकरेंचे आवाहन
Aaditya Thackeray On NEET Agitation: मुंबई :
नीट (NEET) परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) कडून सुरू असलेल्या या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबत अत्यंत आक्रमक पवित्रा घेत देशातील तरुणाईला अन्यायाविरोधात पेटून उठण्याचे आवाहन केले आहे.
“तुमचं सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका” – आदित्य ठाकरे
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, “तुमचं सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे.” पुढे बोलताना त्यांनी २४ जुलै रोजी दुपारी ४:०० वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ) येथे सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. “२४ तारखेला कोणत्याही पक्षाच्या झेंड्याखाली नाही, तर आपल्या देशाच्या तिरंग्याखाली एकत्र येऊया आणि राष्ट्रगीत गाऊया,” असे आवाहन त्यांनी तरुणांना केले. तसेच मुंबई पोलिसांनी दिल्ली पोलिसांसारखा लाठीचार्ज न करता संवेदनशीलपणा दाखवल्याबद्दल त्यांनी मुंबई पोलिसांचे कौतुकही केले.
“व्यवस्था बदलावी लागेल” – उद्धव ठाकरे
दुसरीकडे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीतील जंतरमंतरवर पोहोचून आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दर्शवला. “अभिजीत दीपके यांनी पेटवलेली ही ठिणगी आता देशभरात पसरायला हवी. महाराष्ट्र या लढ्यात पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभा आहे,” असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, “केवळ एका शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याने भागणार नाही, तर आपल्याला संपूर्ण व्यवस्था बदलावी लागेल. जोपर्यंत सरकार बदलत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कोणताही सकारात्मक बदल होणार नाही.”
महाराष्ट्रात ९८ ठिकाणी आंदोलने; पोलिसांचे ‘डिजिटल पेट्रोलिंग’
दिल्लीत पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्रातही या आंदोलनाची धग पोहोचली असून राज्यभरात तब्बल ९८ ठिकाणी ‘सीजेपी’च्या समर्थनासाठी आंदोलने झाली. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी गेल्या १४ दिवसांपासून सोशल मीडियावर विशेष ‘डिजिटल पेट्रोलिंग’ सुरू केले आहे. आंदोलनाशी संबंधित हॅशटॅग, कीवर्ड्स आणि संवेदनशील अकाउंट्सवर पोलीस यंत्रणा बारीक लक्ष ठेवून आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:49 23-07-2026














