Ratnagiri Agriculture News: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते कमी पडू देऊ नका: कृषी सभापती महेश नाटेकर

जिल्हा परिषद कृषी समितीच्या बैठकीत विविध विषयांचा आढावा; राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा व पत्रकारांचा सन्मान

Ratnagiri Agriculture News: रत्नागिरी :

रत्नागिरी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खत आणि युरिया उपलब्ध ठेवा, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना खते कमी पडू देऊ नका, असे स्पष्ट आदेश कृषी सभापती महेश नाटेकर यांनी दिले आहेत. तसेच विहिरींची कामे वेळेत पूर्ण करून लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

कृषी समिती बैठकीत विविध विषयांचा आढावा

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सभागृहात नुकतीच कृषी समितीची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा कृषी विकास अधिकारी अभिजित गडदे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य आणि विविध अधिकारी उपस्थित होते.

सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून भातरोपांची लावणी अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू नये, याकडे विशेष लक्ष देण्याचे सांगण्यात आले. यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील १३ विहिरींची कामे सध्या प्रगतीपथावर असून ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश नाटेकर यांनी दिले. जिल्ह्यात विविध ठिकाणी वनराई वाढवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. या बैठकीत वार्षिक अहवाल व मासिक खर्चाला मंजुरी देण्यात आली असून, सुमारे १० ते १५ विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

पुरस्कारप्राप्त शेतकरी व पत्रकारांचा सत्कार

याच बैठकीत राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्राप्त झालेल्या आनंद देसाई, शैलेश देसाई, मेहरून नाकाडे, अनंत खोपे, दयानंद चौगुले आणि धनंजय केतकर या शेतकऱ्यांचा तसेच पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:56 23-07-2026