दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा; रत्नागिरीत निघाला भव्य मोर्चा! मुस्लिम समाजाची लक्षवेधी उपस्थिती

रत्नागिरी : राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज रत्नागिरी शहरात एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मारुती मंदिर येथून या मोर्चाला सुरुवात झाली असून, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मोर्चाची शांततेत सांगता करण्यात आली.

या मोर्चाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात मुस्लीम समाजाची झालेली प्रचंड आणि लक्षवेधी गर्दी. शहरातील मिरकर वाडा, राजिवडा, उद्यमनगर, आणि कोकण नगर या भागांतील मुस्लीम नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. एकूण सुमारे तीन हजार नागरिकांच्या या मोर्चात तब्बल ७५ टक्के नागरिक मुस्लीम समाजाचे असल्याचे पाहावयास मिळाले.

राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू

या मोर्चावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधातील रागातूनच मुस्लीम समाजाची ही गर्दी जमली होती, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.

दुसरीकडे, भाजप पक्षाकडूनही यावर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. “विद्यार्थ्यांचे मूळ मुद्दे बाजूला सारून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी काही समाज एकत्र आला होता,” असा थेट आरोप भाजपने केला आहे.

आक्षेपार्ह पोस्टर आणि घोषणाबाजी

मोर्चादरम्यान मोदी आणि शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच काही हुल्लडबाजांनी मोदी, शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांची आक्षेपार्ह पोस्टर फडकवल्याचेही पाहावयास मिळाले.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या मोर्चाला कुणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले होते. मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चाने आज संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.