बन्सी गीर गोशाळा व कृषी विभागाचा संयुक्त उपक्रम
रत्नागिरी:
हवामान बदलाचे संकट आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची घटलेली सुपीकता सुधारण्यासाठी Gokrupa Amrut Culture हा नैसर्गिक शेतीतील अत्यंत प्रभावी पर्याय ठरत आहे. या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आज, २७ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत एका विशेष ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
१३८ हून अधिक सूक्ष्मजीवांचा समावेश; घरच्या घरी तयार करणे शक्य
गोकृपा अमृतमध्ये १३८ हून अधिक लाभदायक सूक्ष्मजीव उपलब्ध असून ते जमिनीची सुपीकता वाढविण्यास, मातीतील पोषकतत्त्वांची उपलब्धता सुधारण्यास आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करतात. हे द्रावण शेतकरी घरच्या घरी अत्यंत सहजतेने तयार करू शकतात.
ठिबक सिंचन, थेट पिकांवर फवारणी तसेच सेंद्रिय खतांची गुणवत्ता वाढवण्यासाठीही याचा उपयोग केला जातो. या तंत्रज्ञानामुळे मातीचा पोत सुधारण्यासोबतच पिकांचे उत्पादन व गुणवत्ता वाढते, रासायनिक खतांचा खर्च वाचतो आणि पिकांची रोगप्रतिकारक क्षमता बळकट होते.
गोपालभाई सुतारिया करणार थेट मार्गदर्शन; तालुका कार्यालयात लिंक उपलब्ध
बन्सी गीर गोशाळा (अहमदाबाद) आणि कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक (ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रात बन्सी गीर गोशाळेचे संस्थापक गोपालभाई सुतारिया हे Gokrupa Amrut Culture तयार करण्याची सोपी पद्धत, त्याचे फायदे आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व यावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, महिला शेतकरी आणि विषमुक्त शेतीत रस असणाऱ्या नवयुवकांनी या वेबिनारमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वेबिनारची जॉइनिंग लिंक आणि क्यूआर कोड (QR Code) नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात मोफत कल्चर उपलब्ध
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गावात कृषी विभागाच्या माध्यमातून गोकृपा अमृत मदर कल्चर मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा आणि आजच्या वेबिनारचा लाभ घेऊन नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 27-07-2026














