Parth Pawar Engagement: पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा संपन्न; ‘या’ दिवशी बारामतीत रंगणार विवाहसोहळा

Parth Pawar Engagement Photos: पुणे येथील द रिट्स कार्लटोन हॉटेलमध्ये राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला विशेष सोहळा

पुणे: Parth Pawar Engagement बातमी: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे खासदार पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा काल पुण्यात मोठ्या उत्साहात साखरपुडा संपन्न झाला. येरवडा येथील हॉटेल द रिट्स कार्लटोन येथे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या.

पवार कुटुंबासह दिग्गज राजकीय नेत्यांची उपस्थिती

या साखरपुडा सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह उपस्थित होते. तसेच संपूर्ण पवार कुटुंब या आनंदसोहळ्यात सहभागी झाले होते. राजकीय वर्तुळातील महत्त्वाचे नेते म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, आमदार दत्ता भरणे, निलेश लंके, धनंजय मुंडे आणि आदिती तटकरे यांनी या सोहळ्याला हजेरी लावून पार्थ पवार आणि कायनात दारा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

सोहळ्याच्या उपस्थितीबाबत सांगायचे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ४० आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. याशिवाय खासदार सुनील तटकरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील १५ खासदारांनीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवली.

भावूक क्षण आणि विवाह सोहळ्याची तारीख

साखरपुड्याचा विधी पार पडत असताना वडील अजितदादांची आठवण येऊन पार्थ पवार भावूक झाले होते. या प्रसंगी पार्थ यांच्यासोबत कायनात दारा यादेखील भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. उपस्थितांनी या कौटुंबिक आणि भावूक क्षणाचे साक्षीदार होत दोघांनाही धीर दिला व शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा विवाह सोहळा २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे संपन्न होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

कायनात दारा यांची कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी

कायनात दारा या पंजाबी हिंदू कुटुंबातील आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नवी दिल्लीतील ‘द ब्रिटिश स्कूल, चाणक्यपुरी’ येथे झाले आहे. त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE), लंडन येथून ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ (International Relations) या विषयात बी.एस्सी. (प्रथम श्रेणी सन्मानासह) ही पदवी प्राप्त केली आहे.

त्यांच्या व्यावसायिक अनुभवाबद्दल सांगायचे तर, त्यांनी ‘NDTV 24×7’ मध्ये रिपोर्टर आणि आउटपुट एडिटर म्हणून काम पाहिले आहे. सध्या त्या आपल्या कुटुंबाच्या हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट व्यवसायात सक्रियपणे कार्यरत आहेत.

धार्मिक शंकांचे निरसन आणि शंकराचार्यांचे मार्गदर्शन

या विवाहाच्या संदर्भात समाजात व्यक्त होत असलेल्या धार्मिक शंकांचे निरसन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी करवीर पीठाच्या शंकराचार्यांची भेट घेऊन सविस्तर मार्गदर्शन घेतले. याच भेटीदरम्यान त्यांनी विवाहाची तारीख आणि ठिकाण याबद्दलची माहिती जाहीर केली.

समाजात अशी समजूत प्रचलित आहे की, कुटुंबातील आई किंवा वडिलांचे निधन झाल्यानंतर लग्नकार्य करायचे असल्यास ते एका वर्षाच्या आत करणे आवश्यक असते, अन्यथा पुढील ३ वर्षे घरात लग्नकार्य करता येत नाही. या संदर्भात करवीर पीठाच्या शंकराचार्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. करवीर शंकराचार्य पीठाचा छत्रपती शाहू महाराजांशी ऐतिहासिक संदर्भ असल्याने, प्रचलित रूढी आणि परंपरांची वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी हे मार्गदर्शन घेण्यात आले.

शंकराचार्यांनी स्पष्ट केले की, कुटुंबातील वडिलांचे निधन झाले असल्यास धर्मशास्त्रानुसार आवश्यक ते विधी व संस्कार योग्य प्रकारे पार पाडणे गरजेचे असते. परंतु, एका वर्षाच्या आतच विवाह करणे बंधनकारक नसते. त्यामुळे या संदर्भात कोणीही कोणताही गैरसमज बाळगण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण या वेळी देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 30-07-2026