‘शिवाजी सागर’ऐवजी आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ नाव; राज्य शासनाचा अधिकृत जीआर जारी
मुंबई (विशेष बातमीदार): Koyna Dam Rename संदर्भात पश्चिम महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या जलाशयाच्या नावात महायुती सरकारने मोठा आणि ऐतिहासिक बदल केला आहे. या जलाशयाचे नाव आता अधिकृतपणे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) जारी करण्यात आल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
नावातील बदलाच्या पार्श्वभूमीचा विचार करता, कोयना जलसागराला यापूर्वी केवळ ‘शिवाजी सागर’ या नावाने ओळखले जात होते. मात्र, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अशा प्रकारे एकेरी उल्लेख होणे अयोग्य असल्याने या जलाशयाला महाराजांचे पूर्ण आणि आदरयुक्त नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्रातील शिवप्रेमी नागरिक आणि विविध संघटनांकडून सातत्याने लावून धरली जात होती.
नागरिकांच्या आणि शिवप्रेमींच्या या तीव्र लोकभावनेची गांभीर्याने दखल घेत जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोयना जलाशयाचे औपचारिक नामांतर करण्याबाबत चर्चा केली आणि प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने मंजुरी दिली व शासन निर्णय जारी केला.
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जलप्रकल्पांपैकी एक असलेल्या कोयना धरणाच्या जलाशयाला ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नाव मिळाल्यामुळे शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे महाराजांचा योग्य तो सन्मान राखला गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता सर्व शासकीय कागदपत्रे आणि दैनंदिन व्यवहारात याच नव्या नावाचा वापर केला जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 30-07-2026













