DY Patil Passes Away: माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

शिक्षण, आरोग्य व क्रीडा क्षेत्रातील महान पर्वाचा अंत; कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

DY Patil Passes Away News मुळे देशातील शैक्षणिक व सामाजिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. शिक्षणसंस्थांचे प्रणेते, त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूर येथे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांनी शिक्षण, आरोग्य, आणि क्रीडा क्षेत्रात अथांग साम्राज्य उभारून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली होती.

२२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप या छोट्याशा शेतीप्रधान गावात एका साध्या बहुजन कुटुंबात डी. वाय. पाटील यांचा जन्म झाला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, हा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला. वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला होत शिक्षण क्षेत्रावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. १९८३ मध्ये नवी मुंबईत ‘रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ (RAIT) ची स्थापना करून त्यांनी शैक्षणिक प्रवासाची पायाभरणी केली. आज त्यांच्या डी. वाय. पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर, मुंबई आणि पुणे शहरांत ३ हून अधिक डीम्ड युनिव्हर्सिटीज, ६ खाजगी विद्यापीठे आणि १८० पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत.

डॉ. डी. वाय. पाटील यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून केली. १९५७ ते १९६२ या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर १९६७ आणि १९७२ मध्ये ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. पुढे त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवामुळे त्यांची विविध राज्यांच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. त्यांनी त्रिपुरा (२००९-२०१३) आणि बिहार (२०१३-२०१४) चे राज्यपाल म्हणून काम पाहिले, तसेच पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही यशस्वीपणे सांभाळला. २०१८ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

शिक्षण आणि समाजसेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय अमेरिकेच्या ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी राउंडटेबल’, ब्रिटनच्या ‘नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी’ आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून त्यांना मानद डॉक्टरेट व डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली होती. क्रीडा क्षेत्रात नवी मुंबईतील जागतिक दर्जाचे ‘डी. वाय. पाटील स्टेडियम’ ही त्यांची दूरदृष्टी मानली जाते.

त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. संजय डी. वाय. पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. वाय. पाटील, विजय डी. पाटील, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, कन्या डॉ. नंदिता पालशेतकर आणि नातू ऋतुराज पाटील यांच्यासह मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उत्तुंग आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 04-08-2026