राष्ट्रवादीच्या आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; दिल्लीत केंद्रीय गृहमंत्र्यांशी भेट घेऊन शिफारशीची विनंती
नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार विक्रम काकडे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची औपचारिक भेट घेतली. Vikram Kakade Met Amit Shah या महत्त्वाच्या बैठकीत काकडे यांनी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर करण्याची अधिकृत विनंती केंद्राकडे केली. अजित पवार यांनी राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा योग्य सन्मान करण्यासाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना देण्यात यावा, अशी भावना या भेटीदरम्यान व्यक्त करण्यात आली.
सर्व आमदारांचे सह्यांचे पत्र मुख्यमंत्र्यांना सादर
अजित पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा व विधानपरिषदेतील सर्व आमदारांनी स्वाक्षऱ्यांचे विशेष पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आधीच सुपूर्द केले आहे. या पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे अधिकृत शिफारस तातडीने पाठवावी, अशी विनंती करण्यात आली होती. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठीच विक्रम काकडे यांनी थेट दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत चर्चा केली.
अर्थमंत्री आणि प्रशासक म्हणून क्रांतीकारी योगदान
अजितदादांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत एक कणखर प्रशासक, अहोरात्र कष्ट करणारे लोकप्रतिनिधी आणि ‘ॲक्शन ओरिएंटेड’ नेते म्हणून जनमानसावर ठसा उमटवला. राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी विक्रमी वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडून पायाभूत सुविधा, रस्ते विकास, मेट्रो आणि सिंचन क्षेत्रात क्रांतिकारी निर्णय घेतले. महाराष्ट्रातील सहकार चळवळ मजबूत करण्यासोबतच शेतकऱ्यांना संकटाच्या काळात थेट आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला.
‘अजितदादांचे जाणे म्हणजे एका युगाचा अंत’
अजितदादांचे अचानक निघून जाणे हा महाराष्ट्र आणि देशातील राजकीय-सामाजिक क्षेत्रासाठी मोठा धक्का असून एका ध्येयवादी युगाचा अंत झाल्यासारखे आहे. त्यांनी कृषी, सिंचन, पायाभूत सुविधा व सामाजिक क्षेत्रात दिलेले अतुलनीय योगदान लक्षात घेता त्यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करणे संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद ठरेल. त्यामुळे केंद्र सरकारने या शिफारशीचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन पत्रात व भेटीदरम्यान करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:03 05-08-2026














