कोल्हापूरवरून परतताना प्राणज्योत मालवली; रत्नागिरीसह राजकीय वर्तुळात शोककळा
रत्नागिरीतील भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष राजेश सावंत (वय ५५ वर्षे) यांचे आज रात्री ९ वाजेच्या सुमारास दुर्दैवी निधन झाले. कोल्हापूर येथून रत्नागिरीत परतत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने रत्नागिरी शहर, भाजप परिवार आणि त्यांच्या अफाट मित्रपरिवारात मोठी शोककळा पसरली आहे.
क्रीडापटू ते यशस्वी राजकीय प्रवास
राजेश सावंत हे केवळ एक अभ्यासू राजकीय नेतेच नव्हते, तर ते एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणूनही रत्नागिरीत परिचित होते.
- राजकीय कारकिर्दीची सुरुवात: त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती.
- उपनगराध्यक्ष पद: या काळात त्यांनी रत्नागिरी नगरपालिकेत उपनगराध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती.
- भाजप प्रवेश व नेतृत्व: त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे ते अत्यंत विश्वासू आणि जवळचे कार्यकर्ते मानले जात असत. त्यांच्या संघटनात्मक कौशल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची धुरा सोपवली होती.
कौटुंबिक आणि राजकीय संघर्षात घेतला होता राजीनामा
नुकत्याच पार पडलेल्या रत्नागिरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक नवा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला होता. भाजपमधून ठाकरे गटात गेलेले बाळ माने यांच्या सून आणि राजेश सावंत यांची कन्या शिवानी माने यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीच्या वेळी निर्माण होणारा कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष टाळण्यासाठी आणि पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी राजेश सावंत यांनी अत्यंत संवेदनशील भूमिका घेत भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
पार्थिव रत्नागिरीत आणणार
निधनानंतर सध्या त्यांचे शव पाली येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. तेथून थोड्याच वेळात त्यांचे पार्थिव रत्नागिरी येथे आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच रत्नागिरीतील राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. उद्या राजेश सावंत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.














