घरकुलासाठी कुडतडकर कुटुंबाची पायपीट; न्याय न मिळाल्यास १५ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा

वर्षानुवर्षे शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही घरकुल अपूर्ण; पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद

रत्नागिरी तालुक्यातील कुडतडे लोहारवाडी येथील कुडतडकर कुटुंबावर शासकीय दिरंगाईमुळे बेघर होण्याची वेळ आली आहे. राहते घर अत्यंत जीर्ण आणि मोडकळीस आले असून ते कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या धोकादायक स्थितीत आहे. वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही घरकुल मंजूर होत नसल्याने अखेर रमेश केशव कुडतडकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे.

अर्जांचा प्रवास आणि प्रशासकीय अडथळे

  • सुरुवातीचा अर्ज: रमेश कुडतडकर, त्यांचे बंधू अरविंद कुडतडकर व पुतणे विजय लोहार यांनी ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने’अंतर्गत वैयक्तिक घरकुलासाठी १८ सप्टेंबर २०२४ रोजी ग्रामपंचायतीकडे परिपूर्ण अर्ज दिला होता. ग्रामपंचायतीने तो प्रस्ताव २५ सप्टेंबर २०२४ रोजी समाज कल्याण विभागाकडे (इतर मागास वर्ग बहुजन कल्याण विभाग, रत्नागिरी) वर्ग केला.
  • प्रशासकीय मंजुरीनंतरही टाळाटाळ: नोव्हेंबर २०२५ मध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समितीने १२ जणांच्या घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देऊन निधीसाठी प्रस्ताव पाठवला. मात्र, ‘उद्दिष्ट (टार्गेट) उपलब्ध नाही’ असे कारण सांगून अर्जदारांना माघारी पाठवण्यात आले.
  • मंत्रालयातील भेट अन् ‘मोदी आवास’चे टार्गेट फुल्ल: मार्च २०२६ मध्ये अर्जदारांनी मंत्रालयात भेट घेतली असता, मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार २०२८ पर्यंत या योजनेतून घरकुले दिली जाणार नसल्याने ‘मोदी आवास योजनेतून’ घरकुल देण्याचे सुचवण्यात आले. मात्र, १८ जून रोजी गट विकास अधिकाऱ्यांनी ‘मोदी आवास योजने’तही उद्दिष्ट शिल्लक नसल्याचे स्पष्ट कळवले.
  • लोकशाही दिनातही पदरी निराशा: ४ मे रोजी तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज केल्यानंतर, २० जुलै रोजीच्या सुनावणीदरम्यान पुन्हा ‘उद्दिष्ट उपलब्ध नाही’ असे सांगून अर्जदाराचा अर्ज निकाली काढण्यात आला.

विशेष बाब म्हणून घरकुल मंजुरीची मागणी

आपले मूळ घर अत्यंत जीर्ण झाले असून ते कधीही कोसळू शकते, या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन ‘विशेष बाब’ म्हणून तातडीने घरकुल मंजूर करावे, अशी नम्र विनंती रमेश कुडतडकर यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हास्तरीय लोकशाही दिनाकडे केली आहे.

१५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचा इशारा

गेल्या दोन वर्षांपासून शासकीय दरबारी खेटे मारूनही न्याय मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या रमेश कुडतडकर यांनी प्रशासनाविरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे. येत्या १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत घरकुल मंजूर न झाल्यास, १५ ऑगस्ट रोजी (स्वातंत्र्यदिनी) आपल्या संपूर्ण कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण व आक्रोश आंदोलन करणार असल्याचे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.