खाजगी दवाखाने आणि ओपीडी सेवा पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता
रत्नागिरी:
रत्नागिरीत आज वैद्यकीय बंद पाळण्यात येणार असून, राज्य सरकारच्या होमिओपॅथी पदवीधर डॉक्टरांची नावे मॉडर्न मेडिसिन रजिस्टरमध्ये नोंदवण्याच्या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील आधुनिक वैद्यकशास्त्रज्ञांनी (एम.बी.बी.एस. व पदव्युत्तर डॉक्टर) आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी, दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ही सेवाबंदी लागू होणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र राज्य शाखेने दिलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या हाकेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातही कडक संप पाळला जाणार असून, याबाबतचे अधिकृत पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे.
गेल्या काही काळापासून राज्य सरकारकडून होमिओपॅथी डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिनच्या नोंदणी पुस्तिकेत स्थान देण्याच्या हालचाली सुरू होत्या. या निर्णयाविरोधात एम.बी.बी.एस. आणि उच्च पदवीधारक डॉक्टरांच्या राज्य संघटनेने कायदेशीर आणि तांत्रिक आक्षेप नोंदवत आपला विरोध वारंवार शासनापर्यंत पोहोचवला होता. मात्र, डॉक्टरांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करत सरकारने प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याने राज्यातील वैद्यकीय वर्तुळात तीव्र विरोध निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आय.एम.ए. महाराष्ट्र राज्याने थेट सेवाबंदीचा निर्णय घेतला आहे.
आय.एम.ए. रत्नागिरी शाखेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ६ वाजेपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखाने आणि रुग्णालये सहभागी होणार आहेत. लांबून उपचारासाठी रत्नागिरीत येणाऱ्या रुग्णांची अचानक होणाऱ्या बंदमुळे कोणतीही गैरसोय किंवा परवड होऊ नये, यासाठी संघटनेने प्रसिद्धी माध्यमांद्वारे ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली आहे. आंदोलनादरम्यान केवळ आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू ठेवली जाणार असून, इतर सर्व नियमित सेवा बंद राहणार आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील या नियमांच्या संघर्षामुळे सामान्य रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर नागरिक आणि रुग्णांनी परिस्थिती लक्षात घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन आय.एम.ए. रत्नागिरीचे अध्यक्ष डॉ. निमाद नाफडे आणि सचिव डॉ. अनघा घाग यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 06-08-2026














