Ratnagiri Rain Update: जगबुडी नदी धोकादायक पातळीच्या उंबरठ्यावर

रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; २४ तासांत ३४८.७७ मि.मी. पाऊस

रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. दिवस-रात्र झालेल्या दमदार पावसामुळे २४ तासांत जिल्ह्यात तब्बल ३४८.७७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे खेड येथील जगबुडी नदीची पाणीपातळी ६.६० मीटरवर पोहोचली असून नदी धोकादायक पातळीच्या उंबरठ्यावर आली आहे. याशिवाय कोदवली, बावनदी आणि काजळी या नद्या देखील इशारा पातळीच्या उंबरठ्यावर आल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

जुलै महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला होता. त्यामुळे भात व नाचणी लावणीच्या कामांना मोठा वेग आला असून भात लावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. मध्येच उन्ह, सावली आणि पावसाचा खेळ सुरू राहिल्याने काही वेळा उकाड्यात वाढ झाली होती. मात्र, ४ आणि ५ ऑगस्ट रोजी पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे.

गेल्या २४ तासांत पडलेल्या एकूण ३४८.७७ मि.मी. पावसामुळे सरासरी ३८.७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस चिपळूण तालुक्यात (६५.११ मि.मी.), लांजा तालुक्यात (६४.२० मि.मी.) आणि खेड तालुक्यात (५९.०० मि.मी.) पडला आहे. तर सर्वात कमी पाऊस मंडणगड तालुक्यात (१७.७५ मि.मी.) नोंदवला गेला आहे. बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी सोसाट्याचा वादळी वारा सुरू आहे. सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तालुकानिहाय पाऊस आणि नद्यांच्या पाणीपातळीचा आढावा

जिल्ह्यात झालेल्या तालुकानिहाय पाऊस आणि प्रमुख नद्यांच्या सध्याच्या पाणीपातळीची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

तालुकानिहाय पाऊस (मि.मी. मध्ये):

  • मंडणगड: १७.७५ मि.मी.
  • दापोली: ३८.४२ मि.मी.
  • खेड: ५९.०० मि.मी.
  • गुहागर: १८.६० मि.मी.
  • चिपळूण: ६५.११ मि.मी.
  • संगमेश्वर: ४१.३३ मि.मी.
  • रत्नागिरी: २२.११ मि.मी.
  • लांजा: ६४.२० मि.मी.
  • राजापूर: २२.२५ मि.मी.
  • एकूण पाऊस: ३४८.७७ मि.मी.

नद्यांची सध्याची पाणीपातळी:

  • जगबुडी: ६.६० मी.
  • वाशिष्ठी: २.४६ मी.
  • शास्त्री: ३.२० मी.
  • सोनवी: २.९० मी.
  • काजळी: १३.७० मी.
  • कोदवली: ३.२० मी.
  • मुचकुंदी: १.७० मी.
  • बावनदी: ६.२७ मी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 06-08-2026