ॲप डाउनलोड करण्यास लावून डेबिट कार्डची माहिती घेतली; रत्नागिरी शहर पोलिसांत सायबर गुन्हा दाखल
रत्नागिरी : Gas Scam च्या आणखी एका धक्कादायक प्रकारात रत्नागिरी शहरातील एका शिक्षकाची तब्बल ₹6,48,612 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. “तुमचा गॅस सप्लाय बंद होणार आहे, आम्ही मदत करतो,” असे सांगत अज्ञात सायबर भामट्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर व्हॉट्सॲपवर पाठविलेली ‘Mahanagar Gas Bill Update’ नावाची ॲप्लिकेशन फाईल उघडण्यास भाग पाडून डेबिट कार्डची माहिती मिळवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोन कॉलद्वारे जाळ्यात ओढले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश विश्राम खापरे (वय ५४) हे शिक्षक असून ते सिद्धिविनायक नगर, शिवाजीनगर, रत्नागिरी येथे राहतात. ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ ते ४ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने स्वतःला महानगर गॅस एजन्सीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत गॅस सेवा बंद होणार असल्याचे कारण पुढे केले.
व्हॉट्सॲपवर ॲप पाठवून घेतली बँक माहिती
तक्रारीनुसार, अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या व्हॉट्सॲपवर ‘Mahanagar Gas Bill Update’ नावाची ॲप्लिकेशन फाईल पाठवली. ती फाईल उघडण्यास सांगून त्यामध्ये डेबिट कार्डची माहिती भरण्यास लावली. ही माहिती मिळाल्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या खात्यातून एकूण ₹6,48,612 रक्कम काढून फसवणूक केल्याचा आरोप आहे.
सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६०/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(क) आणि ६६(ड) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
सायबर गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारे ग्राहक सेवा, गॅस एजन्सी, वीज कंपनी किंवा बँकेच्या नावाने फोन करून मोबाईलवर ॲप किंवा APK फाईल पाठवली जाते. अशा कोणत्याही अनोळखी फाईल डाउनलोड करू नये किंवा त्यामध्ये बँक अथवा डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती भरू नये. संशयास्पद कॉल आल्यास संबंधित कंपनीच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून माहितीची खात्री करावी.














