मध्यवर्ती भागातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर कारवाई; तरुणीची सुटका, संशयित महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी
चिपळूण:
Chiplun Crime News अंतर्गत चिपळूण शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या देहविक्री व्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) रत्नागिरीच्या पथकाने छापा मारून कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान एका ३९ वर्षीय महिलेला पोलिसांनी रंगेहात अटक केली असून, तिला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण शहरातील एका हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर अनैतिक व्यवसाय चालवला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने मंगळवारी अचानक धाड टाकली. या पाहणीदरम्यान मुंबईतील एका २३ वर्षीय तरुणीला या व्यवसायात ढकलण्यात आल्याचे उघडकीस आले. संशयित आरोपी महिला या तरुणीकडून जबरदस्तीने हा व्यवसाय करवून घेत होती.
पोलिसांनी घटनास्थळावरून पीडित तरुणीची सुरक्षित सुटका केली असून तिला वैद्यकीय तपासणीनंतर सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर देहविक्रीचा हा व्यवसाय चालवणाऱ्या ३९ वर्षीय संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला तात्काळ अटक करण्यात आली.
बुधवारी संशयित आरोपी महिलेला चिपळूण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपी महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शहरातील मध्यवर्ती भागात झालेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पोलीस या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 06-08-2026














