कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची बैठक; उमेदवारांना मिळणार २ आठवड्यांचे पूर्व-रोजगार प्रशिक्षण
मुंबई:
Fadnavis Government Plan for Gen Z अंतर्गत राज्यातील नाराज असलेल्या ‘जेन Z’ (Gen Z) युवक-युवतींना आकर्षित करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी फडणवीस सरकारने विशेष योजना आखली आहे. याअंतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यभरात १ हजार रोजगार मेळाव्यांचे (Job Fairs) आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यांची व्यापक माहिती शेवटच्या घटकातील गरजू तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.
मंत्रालयात मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील, सदस्य डॉ. सरोजिनी राऊत, रवींद्र देशपांडे, विशाल टिब्रेवाल, जयेश ढाके, राहुल खोले आणि सदस्य सचिव तथा कौशल्य विकास आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि निवडीचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध उपायांवर चर्चा करण्यात आली.
केवळ रोजगार मेळावे न घेता उमेदवारांना दोन आठवड्यांचे पूर्व-रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या आठवड्यात व्यक्तिमत्त्व विकास (Personality Development), शिष्टाचार (Etiquettes), बायोडाटा लेखन आणि संभाषण कौशल्यांवर भर दिला जाईल. तर दुसऱ्या आठवड्यात अॅप्टिट्यूड टेस्टनुसार इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट आणि मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांत थेट प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. या पूर्व-प्रशिक्षणामुळे तरुणांमधील कौशल्य वाढून रोजगार मेळाव्यांमधील निवडीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
राज्य सरकारचा ‘डॅमेज कंट्रोल’ प्लॅन आणि रूपरेषा:
व्यापक संपर्क: केवळ आयटीआयपुरते मर्यादित न राहता इतर महाविद्यालयांतील विद्यार्थी, अपस्किलिंगची गरज असलेले तरुण आणि सामाजिक संस्थांशी संपर्क साधून मेळाव्याचा विस्तार केला जाईल.
तालुकास्तरावर माहिती: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात रोजगार मेळाव्यांची सविस्तर माहिती पोहोचवली जाईल.
समुपदेशन: तरुणांना रोजगाराचे महत्त्व आणि स्वयंरोजगाराचे फायदे पटवून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती व एनजीओंच्या (NGOs) माध्यमातून समुपदेशन केले जाईल.
पूर्व-प्रशिक्षण: रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांना २ आठवड्यांचे विशेष पूर्व-रोजगार प्रशिक्षण दिले जाईल.
एकत्रित अंमलबजावणी: या उपक्रमाच्या प्रभावी नियोजनासाठी संबंधित विभागाचे अधिकारी व प्रदेश समन्वय समिती यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 06-08-2026














