मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या मुद्द्यावरून सरकारवर गंभीर आरोप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही संशय व्यक्त
अंतरवाली सराटी:
Manoj Jarange Patil Press Conference घेताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि सत्ताधारी नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठवाड्यात नुकतीच रद्द करण्यात आलेली नवीन कुणबी प्रमाणपत्रे ही १५ लाख रुपयांसाठी आणि राजकीय द्वेषापोटी रद्द करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकारामागे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात असल्याचा दावा करत, ” एका बावनकुळेंसाठी भाजपचे १५-२० आमदार पाडून टाकीन,” असा थेट धमकीवजा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “फडणवीस साहेब, तुम्ही विनाकारण मराठ्यांना अंगावर घेत आहात. बावनकुळे स्वतः फोन करून कुणबी नोंदी रद्द करायला लावत आहेत. यशवंता दहीहंडे यांची उर्दू भाषेतील अधिकृत नोंद सापडली होती, जी ग्रामपंचायतीच्या दप्तरी लावण्यात आली. मात्र, तिथे भाजपचा उमेदवार निवडून आला नाही म्हणून फोन करून ती नोंद रद्द करायला लावली.” पुढे पुरावे दाखवताना संतप्त झालेले जरांगे म्हणाले, “शासनाच्या एकाही अधिकाऱ्याकडे नसतील एवढे पुरावे माझ्याकडे आहेत. बावनकुळेंनी पत्र देऊन नोंदी रद्द करायला लावल्या आणि ‘ऑफ द रेकॉर्ड’ १५ लाख रुपयांची मागणी केली जाते. अवघ्या १५ लाख रुपयांसाठी मराठ्यांची प्रमाणपत्रे रद्द करता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या वेळी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही उघडपणे संशय व्यक्त केला. ज्योती सुधाकर शिंदे यांची संपूर्ण वंशावळ पत्रकारांसमोर मांडताना ते म्हणाले, “मला आजपर्यंत शिंदे साहेबांवर कधीच संशय येत नव्हता. मी आधीच संजय शिरसाट, संदीपान भुमरे आणि उदय सामंत यांना मुंबईत रुग्णालयात असताना सांगितले होते की, शिंदे साहेबांनी ‘डबल गेम’ करू नये. मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात कसे काय पोहोचतात? तुमच्याच सांगण्यावरून मराठ्यांच्या काही समन्वयकांना माझ्याविरोधात आंदोलनाला बसवले जाते का?” असा थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 06-08-2026














