Ratnagiri Municipal Council: परटवणे-वरचा फगरवठारकडे जाणारा रस्ता खचून बंद!

संरक्षणासाठी काढलेल्या पायाच्या खोदाईमुळे रस्ता पुन्हा ढासळला; डीएसपी बंगला मार्गे वळसा घालण्याची वेळ

रत्नागिरी: शहरातील परटवणे ते वरचा फगरवठार मार्ग संरक्षण भिंतीच्या कामादरम्यान बुधवारी सायंकाळी पुन्हा खचल्याने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना डीएसपी बंगला मार्गे मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असून, त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या ठिकाणी एका बांधकाम व्यवसायिकाने केलेल्या खोदाईमुळे पहिल्याच पावसात संरक्षण भिंत कोसळली होती. रस्त्यालाही भेगा पडल्याने नागरिक धोकादायक परिस्थितीत प्रवास करत होते. तक्रारीनंतर संबंधित व्यवसायिकाने संरक्षण भिंत बांधण्यास सहमती दर्शवली होती. असे असताना काम पूर्ण झाल्यानंतर पुढील भिंतीच्या पायासाठी खोदाई सुरू असताना रस्त्याचा सुमारे ९० टक्के भाग पुन्हा ढासळला.

नगर परिषदेकडून रस्ता बंद; नागरिकांचा तीव्र आक्षेप

रस्ता पूर्णपणे खचल्याने पायी चालणेही धोकादायक बनले असून नगर परिषदेने मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. स्थानिकांनी अतिरिक्त खोदाईमुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला आहे. पाणी सभापती निमेश नायर यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली असून, नगर परिषद पुढे कोणती कारवाई करते, याकडे परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:11 07-08-2026