Rajapur MSEDCL News: खंडित वीज पुरवठ्यामुळे साखरी-नाटेकर त्रस्त; जैतापूर ब्रिज येथील ११ केव्ही आपत्कालीन वीज वाहिनी जोडण्याची मागणी

महावितरणकडे साखरी नाटे ग्रामपंचायतीचे निवेदन; मच्छीमार, व्यावसायिक व ग्रामस्थांचे मोठे नुकसान

राजापूर: सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे राजापूर तालुक्यातील साखरी नाटे गावातील नागरिक, स्थानिक व्यापारी आणि मच्छी व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक तसेच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी साखरी नाटे ग्रामपंचायतीने महावितरणच्या राजापूर (आडिवरे) महावितरण कनिष्ठ अभियंता कार्यालयाकडे निवेदनाद्वारे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. साखरी नाटेपासून अवघ्या २ कि.मी. अंतरावर असलेल्या जैतापूर ब्रिजमार्गे येणाऱ्या ११ केव्ही आपत्कालीन वीज वाहिनीचा पुरवठा गावाशी जोडून द्यावा, असा प्रस्ताव ग्रामपंचायतीने मांडला आहे.

साखरी नाटे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आणि मोठे मच्छीमारी बंदर असून या गावाची लोकसंख्या सुमारे साडेचार हजार आहे. गावात ऐतिहासिक यशवंतगड किल्ला, मोठी बाजारपेठ आणि विविध व्यावसायिक उपक्रम कार्यरत आहेत. कोल्ड स्टोरेज, आईस फॅक्टरी, मच्छीपूरक उद्योग, वेल्डिंग, फॅब्रिकेशन व जाळीकाम यांसारखे अनेक लघुउद्योग येथे चालतात. मात्र, वारंवार होणारे लोडशेडिंग, शॉर्टसर्किट, वीजवाहिन्या व पोल पडणे आणि पावसाळ्यात वीज यंत्रणा कोसळणे यामुळे गावाचा वीजपुरवठा सातत्याने विस्कळीत होतो.

पाणीपुरवठ्यावर परिणाम अन् लाखांचे नुकसान

ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, काही वेळा आठवडाभर वीज नसल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होते. याचा थेट फटका स्थानिक व्यावसायिक आणि मच्छीमारांना बसून दरमहा लाखांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच वीज नसल्यामुळे ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेवरही विपरीत परिणाम होऊन पिण्याच्या पाण्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमोडते.

जैतापूर ब्रिज येथील ११ केव्ही आपत्कालीन वीज वाहिनी साखरी नाटे गावाशी जोडल्यास नैसर्गिक आपत्ती किंवा तांत्रिक बिघाडाच्या काळातही पर्यायी व्यवस्थेद्वारे वीजपुरवठा सुरू राहील. यामुळे ग्रामस्थांना व व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे.

Tata nexon

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 07-08-2026