मोबाईल स्फोटानंतर झालेल्या दुचाकी अपघातातील दोन तरुणांचा उपचारादरम्यान झाला होता मृत्यू
रत्नागिरी: देवरूख–पांगरी मार्गावर २६ एप्रिल रोजी घडलेल्या अत्यंत भीषण आणि खळबळजनक दुचाकी अपघाताची अखेर तीन महिन्यांनंतर देवरूख पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद करण्यात आली आहे. तपास प्रक्रिया, घटनास्थळ पंचनामा आणि आवश्यक सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी देवरूख पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात बीएनएसएस (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू क्रमांक २७/२०२६ व २८/२०२६ अशी अधिकृत नोंद करण्यात आली आहे. फेटल मोटार अपघात रजिस्टरमधील कागदपत्रांची सखोल पडताळणी आणि सविस्तर चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
मोबाईलचा स्फोट अन् थेट मोरीवर आदळली दुचाकी
२६ एप्रिल रोजी लग्नकार्य आटोपून देवरूखहून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना पांगरी फाट्याजवळ दुचाकीस्वाराच्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला होता. अचानक झालेल्या या स्फोटामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यांची टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी रस्त्यालगतच्या दगडी मोरीवर जोरदार आदळली. या भीषण अपघातात सुमित विलास कांबळे आणि विकास काशिराम कांबळे (दोघेही रा. हातखंबा, जि. रत्नागिरी) हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. दुर्दैवाने उपचारादरम्यान या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता.
या दुर्दैवी घटनेने त्यावेळी संपूर्ण रत्नागिरी जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली होती. आता तीन महिन्यांच्या प्रदीर्घ तपासानंतर या प्रकरणाची अधिकृत पोलीस दप्तरी नोंद झाल्याने या अपघाताच्या कायदेशीर तपास प्रक्रियेला औपचारिक पूर्णविराम मिळाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 07-08-2026














