Ratnagiri ZP Education Department News: जि. प. शालेय गणवेश तपासणीसाठी टीम नेमणार; शिक्षणाधिकारी किरण लोहार पहिल्याच दिवशी ‘ॲक्शन मोड’वर

सेवानिवृत्त शिक्षकांची कामे प्रलंबित न ठेवण्याचे निर्देश; विविध विभागांचा घेतला सविस्तर आढावा

रत्नागिरी:

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आलेल्या गणवेशाचा दर्जा तपासण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र टीमची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती नूतन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली. पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी किरण लोहार ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी शिक्षण विभागातील सर्व कामकाज आणि शाखांचा सविस्तर आढावा घेतला.

दिलेली कामे वेळेत पूर्ण करा, कामे प्रलंबित ठेवू नका आणि बैठकीस गैरहजर असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोटीस बजावा, असे कडक आदेशही लोहार यांनी बैठकीत दिले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

गणवेशाचा दर्जा निकृष्ट असल्यास कारवाई

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरीत करण्यात आले आहेत. परिपत्रकानुसार या गणवेशाचा दर्जा तपासणी प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्यामार्फत होणे आवश्यक होते. मात्र, अद्याप ही तपासणी न झाल्याने लोहार यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली आहे. तातडीने विशेष टीम नेमून तपासणीचे आदेश देण्यात आले असून, गणवेशाचा दर्जा निकृष्ट आढळल्यास संबंधित पुरवठादारांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच दुसऱ्या गणवेशाचा निधी का आला नाही, याची माहिती घेऊन निधी उपलब्ध होताच शाळांना वितरित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“सेवानिवृत्त शिक्षकांची कामे प्रलंबित ठेवू नका”

पेंशनधारक आणि सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या प्रलंबित कामांसाठी वारंवार जिल्हा परिषदेत चक्रा मारत आहेत. त्यांची कामे तातडीने मार्गी लावा, त्यांना फेऱ्या मारायला लावू नका, अशा स्पष्ट सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळावा, यासाठी आहाराचा दर्जा तपासून जिल्ह्यातील पोषण आहाराची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पदभार स्वीकारल्यानंतर लोहार यांनी साखरपा येथील दोन शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. साखरपा येथील शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या बाबतीत उत्कृष्ट काम केल्याचे सांगत त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 07-08-2026