“तरुण पिढी आपल्या संस्कृतीची दूत”; झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींवर जोरदार टीका
नवी दिल्ली:
दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर काही दिवसांपूर्वीच ‘जनरेशन झेड’ (Gen Z) बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत यांचा सूर आता पूर्णपणे बदलल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘Gen Z’ बाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने आता तरुण पिढीचे कौतुक केले आहे.
माध्यमांशी बोलताना कंगना रनौत म्हणाल्या, “‘जनरेशन झेड’ ही आपल्या देशाची ताकद आणि एका अर्थाने आपल्या देशाचे भविष्य आहे. मोहन भागवत अत्यंत आदरणीय असून त्यांचे ज्ञान आणि अनुभव ऐकण्याची संधी आम्हाला अनेकदा मिळाली आहे. देशातील नवी तरुण पिढी ही आपल्या संस्कृतीचे दूत (Culture Ambassadors) म्हणून पुढे येत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.”
झारखंडमधील परीक्षांमधील अनियमिततेवर प्रतिक्रिया
झारखंडमध्ये JPSC आणि JSSC भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेची CBI चौकशी व्हावी, या मागणीसाठी विद्यार्थी गेली १३ दिवस रांची येथे आंदोलन करत आहेत. यावर भाष्य करताना कंगनाने सांगितले की, “आपली Gen-Z मधील तरुण पिढी खरोखरच विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करत आहे. अशा प्रकारच्या समस्या अनेक दशकांपासून सुरू असून, सर्वत्रच अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.”
“राहुल गांधी देशासाठी धोका निर्माण करण्यात पुढे”
याच वेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, “केवळ तमाशा करण्यासाठी पुढे येणारा काँग्रेस पक्ष झारखंडमध्ये कुठेच दिसत नाही, जिथे विद्यार्थी कठीण परिस्थितीत आंदोलन करत आहेत. राहुल गांधी अशा ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत नाहीत; मात्र जेव्हा तरुणांना भडकवण्याची वेळ येते, तेव्हा देशासाठी धोका निर्माण करण्यात तेच सर्वात पुढे असतात.”
मेटाने माफी मागितल्याबद्दल समाधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ हटवल्यावरून निर्माण झालेल्या वादावर ‘मेटा’ (Meta) या कंपनीने माफी मागितल्यानंतर कंगना रनौत यांनी समाधान व्यक्त केले. माहिती तंत्रज्ञान संसदीय समितीचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, “मी सुद्धा त्या समितीची सदस्य आहे. आमचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी ठाम भूमिका घेत ‘मेटा’कडे माफीची मागणी केली होती. देशविरोधी घटकांना कशा प्रकारे प्रोत्साहन दिले जाते याबद्दल आम्ही चिंता व्यक्त केली होती. त्यांनी आपली चूक मान्य केली, याचा आम्हाला आनंद आहे.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:02 07-08-2026














