MSRTC Ganesh Utsav Extra Buses 2026: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीच्या ५,२२० जादा बसेस; ७ ते २५ सप्टेंबरदरम्यान धावणार

१० ऑगस्टपासून ४० प्रवाशांच्या गटासाठी गट आरक्षण; प्रवाशांना मिळणार सवलतींचा लाभ

मुंबई:

यंदा श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST) सज्ज झाले आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातील रहिवाशांसाठी महामंडळाने ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ५,२२० जादा बसेस सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. “गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा सण आहे. नफा-तोट्याचा विचार न करता प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी कटिबद्ध आहे,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

ऑनलाईन आणि गट आरक्षणाची सुविधा

  1. वैयक्तिक आरक्षण:या जादा बसेसचे आरक्षण एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच ‘MSRTC Bus Reservation’ मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय नागरिक बसस्थानकांवरील खिडकीवरूनही आरक्षण करू शकतात.
  2. गट आरक्षण (Group Booking):किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी १० ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा सुरू होत आहे.
    • सवलतींचा लाभ: गट आरक्षणामध्ये महिला आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५०% सवलत, तर ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना १००% सवलत (मोफत प्रवास) लागू राहील.

महामार्गांवर विशेष यंत्रणा आणि दुरुस्ती पथके

  • अहोरात्र सेवा: मुंबई, ठाणे व पालघर विभागांतील प्रमुख बसस्थानकांमधून ७ सप्टेंबरपासून या गाड्या सोडल्या जातील. प्रवाशांच्या सुविधेसाठी स्थानकांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी २४ तास कार्यरत असणार आहेत.
  • वाहनदुरुस्ती पथके: कोकण मार्गावरील प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रमुख महामार्गांवर विशेष वाहनदुरुस्ती पथके (Mobile Van Units) तैनात करण्यात येणार आहेत.

अलीकडेच पार पडलेल्या आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीने ५,२०० जादा गाड्या सोडल्या होत्या; त्याच धर्तीवर गणेशोत्सवातही प्रवाशांना सुरक्षित व अखंड सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:25 07-08-2026