Prithviraj Chavan on Devendra Fadnavis: “देवेंद्र फडणवीसांना देश किंवा Gen Z स्वीकारणार नाही”; पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रीपदावरून फडणवीसांना तीव्र विरोध

नीटने फेरफार आणि महाराष्ट्र कनेक्शनवरून हल्लाबोल; संजय राऊतांपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याने चर्चांना उधाण

कराड / मुंबई:

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नव्या शिक्षण मंत्र्याच्या शोधावरून दिल्लीसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पदासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस यांच्या नावाला स्पष्ट शब्दांत विरोध केला आहे. “आजची तरुण पिढी (Gen Z) किंवा देश देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही,” असा घणाघाती दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सातत्याने केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस हेच योग्य उमेदवार असल्याचे सांगत असताना, पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या या विरोधी भूमिकेमुळे राजकीय भुवया उंचावल्या आहेत.

‘नीट’ पेपर फुटीचे महाराष्ट्र कनेक्शन आणि SIT ची मागणी

पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामागील कायदेशीर आणि प्रशासकीय कारणे स्पष्ट केली. चव्हाण म्हणाले की, २०२६ च्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपर फुटी प्रकरणाचे धागेधोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले असून राज्यातील अनेक कोचिंग क्लासेस आणि पेपर तयार करणाऱ्यांची नावे समोर आली आहेत.

“देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्रीही आहेत. त्यामुळे राज्यातील या घोटाळ्याबाबत त्यांच्यावर विश्वास व्यक्त करणे कठीण आहे. या संपूर्ण घोटाळ्यात महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातील राजकीय नेत्यांचाही सहभाग होता का, हे केवळ निष्पक्ष एसआयटी (SIT) चौकशीनंतरच स्पष्ट होऊ शकेल,” असे चव्हाण म्हणाले.

प्रल्हाद जोशींची नियुक्ती केवळ ‘तात्पुरती सोय’

पृथ्वीराज चव्हाण यांनी सीजेपी (CJP) आणि तरुण पिढीने (Gen Z) केलेल्या ऐतिहासिक आंदोलनाचे कौतुक केले. या आंदोलनाच्या दणक्यामुळेच अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला, हा आंदोलकांचा मोठा विजय आहे, असे त्यांनी नमूद केले.

तसेच, “पंतप्रधानांनी तूर्तास केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. जोशी यांच्याकडे आधीच तीन महत्त्वाची मंत्रालये असताना आता हे चौथे खाते जोडले गेले आहे. मात्र, संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापर्यंत केलेली ही केवळ एक तात्पुरती सोय आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.

“केंद्रीय मंत्रिमंडळात क्षमतेचा अभाव; कॉर्पोरेट जगतातील व्यक्तीचा विचार व्हावा”

कोलमडलेली शिक्षण व्यवस्था रुळावर आणण्यासाठी एका राष्ट्रीय स्तरावरील पूर्णवेळ शिक्षण मंत्र्याची देशाला गरज आहे; परंतु सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात अशी क्षमता असलेला एकही नेता दिसत नसल्याची टीका चव्हाण यांनी केली. शिक्षण व्यवस्थेत आरएसएस (RSS) विचारसरणीच्या निष्ठावंतांची भरती केल्यामुळेच ही बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.

सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर विश्वास उरला नसल्याने, आता एखादा शिक्षणतज्ज्ञ, माजी कुलगुरू किंवा नंदन निलेकणी यांच्यासारख्या कॉर्पोरेट जगतातील नामांकित व्यक्तीचा या पदासाठी विचार केला जाऊ शकतो का, असा प्रश्नही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:03 07-08-2026