मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डीबीटीद्वारे (DBT) निधी वितरित; पात्र शेतकऱ्यांना तातडीने नवे खरीप पीक कर्ज देण्याचे बँकांना निर्देश
मुंबई:
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत राज्य सरकारच्या वतीने शेतकरी कर्जमाफीचा पहिला हप्ता अधिकृतपणे वितरित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे (DBT) राज्यातील ६ लाख २२ हजार २०७ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर थेट ५,०२९ कोटी रुपयांची भरघोस रक्कम हस्तांतरित केली आहे.
ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण झाले होते, त्यांच्या खात्यांवर ही रक्कम जमा करून त्यांची कर्जखाती पूर्णपणे निरंक (Nil) करण्यात आली आहेत.
पात्र शेतकऱ्यांना तातडीने नवे खरीप पीक कर्ज मिळणार
कर्जमाफीचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर राज्य शासनाने राज्यातील सर्व बँकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ज्या पात्र शेतकऱ्यांची कर्जखाती आता निरंक झाली आहेत, त्यांना आगामी खरीप हंगामासाठी तातडीने नवे पीक कर्ज (Kharif Crop Loan) उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून शेतकऱ्यांना नवीन पेरणी व शेतीकामांसाठी आवश्यक आर्थिक बळ मिळेल.
तसेच, पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे, त्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या खात्यावरही टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे.
“एनपीएवरील व्याज रद्द झाल्याने खाती झाली नील” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पहिल्या टप्प्यातील निधी वितरणानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले:
“मला अतिशय आनंद होत आहे की, आपण घोषित केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ची पहिली यादी सर्व ग्रामपंचायतींना पाठवण्यात आली होती. शेतकऱ्यांना कोणतीही किचकट प्रक्रिया किंवा अर्ज न करता केवळ साध्या पद्धतीने आधार ऑथेंटिकेशन करायचे होते.
आज पहिल्याच टप्प्यात ६,२२,२०७ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ५,०२९ कोटी रुपयांचा लाभ वितरित झाला असून ही कर्जखाती ‘निल’ झाली आहेत. एनपीए (NPA) खात्यांवर बँकांनी लावलेलं व्याज रद्द केल्यामुळे खात्यातील शिल्लक रक्कम आणि शासनाने भरलेली रक्कम सारखी होऊन खाती नील झाली आहेत.
बँकांकडून त्रुटींमुळे १२ लाख खाती परत पाठवली गेली होती; मात्र आठवड्याभरात त्या चुका सुधारून ती खातीही क्लिअर केली जातील आणि टप्प्याटप्प्याने सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केले जातील.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:28 07-08-2026














