सर्वोच्च न्यायालयातील पक्ष आणि चिन्ह सुनावणीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचे ट्विट; उद्धव ठाकरे दुपारी घेणार पत्रकार परिषद
मुंबई: Sanjay Raut on PM Modi (संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका): शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जोरदार सुनावणी सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार पाडण्याबाबत आणि पक्ष हडपण्याबाबत केलेला बिनतोड युक्तिवाद चर्चेत आहे.
या न्यायालयीन घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. पाठोपाठ शिंदे गटाच्या खासदारांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी “श्रीमान मोदी” असा उल्लेख करत जोरदार निशाणा साधला आहे.
“संसदेत जाण्यास वेळ नाही, पण गद्दारांना फापडा-जिलेबी पार्टी”; राऊतांचा प्रहार
खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिंदे गटाच्या दिल्ली दौऱ्याला “गद्दारांचा मेळा” असे संबोधले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून संसदेत कामकाज चालत नसताना आणि पंतप्रधान संसदेत फिरकत नसताना या खासदारांना भेटत असल्याचा संदर्भ राऊतांनी दिला.
“श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फापडा, ढोकळा, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ आहे, पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही. हा जनतेचा आणि संविधानाचा थेट अपमान आहे,” असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढा अंतिम टप्प्यात
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी विधिमंडळ पक्षालाच मूळ राजकीय पक्ष मानण्याच्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि नैतिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे संदर्भ, केरळ काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या विविध याचिकांचा दाखला दिला आहे.
ठाकरे गटाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे शिंदे गट कायदेशीर अडचणीत आल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. या प्रकरणात आता शिंदे गटाकडून प्रतिवाद केला जाणार असून, सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी काय हस्तक्षेप करते किंवा निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी १२ वाजता घेणार पत्रकार परिषद
न्यायालयीन युक्तिवाद आणि दिल्लीतील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी १२ वाजता ‘मातोश्री’ निवासस्थानी महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि शिंदे-मोदी भेटीवर काय भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 08-08-2026














