Prashant Kishor Sunetra Pawar Meeting: ‘अख्खा महाराष्ट्र आठ वेळा पालथा घातलाय, आम्हाला रणनीतीकाराची गरज नाही’; सुनेत्रा पवार-प्रशांत किशोर भेटीवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया

प्रशांत किशोर यांची पक्षाच्या सल्लागारपदी नेमणूक झालेली नाही; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे स्पष्टीकरण

मुंबई: Prashant Kishor Sunetra Pawar Meeting (प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार भेट): प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या सुनेत्रा पवार यांच्यात पार पडलेल्या भेटीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अत्यंत स्पष्ट आणि थेट प्रतिक्रिया दिली आहे. “ती एक औपचारिक सदिच्छा भेट असू शकते. आम्ही प्रत्यक्ष मैदानात (फिल्डवर) उतरून काम करणारे कार्यकर्ते आहोत, मी आठ वेळा संपूर्ण महाराष्ट्र उलथापालथा केला आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही रणनीतीकाराची किंवा सर्व्हेची गरज नाही,” अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी आपली भूमिका मांडली.

बिहार राजकीय घडामोडींनंतर प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. या बैठकीत तटकरे यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या, त्यावर बोलताना त्यांनी या सर्व चर्चांवर पूर्णविराम लावला.

‘मी माझ्या आयुष्यात कधीही निवडणुकीचा सर्व्हे केला नाही’

प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या चर्चेवर भाष्य करताना सुनील तटकरे म्हणाले, “प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीची माहिती मला मिळाली. मात्र, त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबद्दल मला कल्पना नाही. आम्ही अत्यंत प्रॅक्टिकल (व्यवहार्य) पद्धतीने काम करणारे नेते आहोत. आदरणीय पवार साहेब, अजितदादा आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत मी दीर्घकाळ काम केले आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात निवडणुकीसाठी कधीही कोणताही सर्व्हे केलेला नाही.”

ते पुढे म्हणाले की, “मला असल्या कोणत्याही रणनीतीकाराची किंवा सर्व्हे एजन्सीची गरज भासत नाही. गावातील सामान्य नागरिक आणि तरुण वर्गाला भेटल्यानंतर मला निवडणुकीचा आणि जनभावनेचा अचूक अंदाज येतो. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचा संपूर्ण कानाकोपरा मला चांगला ठाऊक आहे.”

‘प्रशांत किशोरांची पक्षात कोणतीही नेमणूक झालेली नाही’

प्रशांत किशोर पक्षासाठी काम करणार का? या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले, “ते एक प्रसिद्ध रणनीतीकार असतील, पण ते आमच्या पक्षासाठी काम करत आहेत की नाही याची मला कोणतीही माहिती नाही. जर त्यांची पक्षाच्या सल्लागारपदी अधिकृत नेमणूक झाली असती, तर प्रदेशाध्यक्ष म्हणून त्याची पहिली माहिती मलाच असती. केवळ एक सदिच्छा भेट झाली म्हणजे त्यांची नियुक्ती झाली असा अर्थ होत नाही.”

“आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ (NDA) आघाडीचा प्रमुख घटक आहोत. अजितदादांच्या निधनानंतर उपस्थित झालेल्या सर्व प्रश्नांवर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशांत किशोर हे भाजपविरोधात निवडणूक लढवून जिंकले आहेत, ती त्यांची वैयक्तिक राजकीय भूमिका आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

पक्षाचे संघटन आणि राजकीय गोत्र मजबूत!

आपल्या पक्षाच्या कामगिरीचा आलेख मांडताना तटकरे यांनी सांगितेले की, “२०१४ मध्ये आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढलो होतो, त्यावेळी अनेक आरोप होऊनही पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या. त्यानंतर २०१९ मध्येही पक्षाची कामगिरी उत्तम राहिली. संघटना बांधताना शेतकरी, कष्टकरी आणि उद्योजकांना नेमकं काय हवं आहे, याची आम्हाला उत्तम जाणीव आहे. सर्व्हे करणे चुकीचे नाही, पण आम्हाला आमचे राजकीय गोत्र आणि जमिनीवरील वास्तव उत्तम प्रकारे समजते.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 08-08-2026