Uddhav Thackeray: “मोदी नवे स्वामी झाले का?”; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आश्वासनावरून उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

फुटीर खासदारांच्या भेटीवरून ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात; “भिऊ नका हा धमकीवजा संदेश नेमका कोणाला?”

मुंबई: Uddhav Thackeray News (उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि तृणमूल काँग्रेसमधून (TMC) बाहेर पडलेल्या खासदारांची नुकतीच भेट घेत “भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी आहे,” असे आश्वासन दिले होते. या भेटीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“कोर्टात सुनावणी सुरू असताना तुम्ही फुटीर खासदारांची भेट का घेतली? त्यातून काय संदेश द्यायचा होता? अमित शाह, देवेंद्र फडणवीस की थेट कोर्टाला यातून धमकी द्यायची होती?” असा थेट आणि तिखट सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

“पंतप्रधान मोदी नवे ‘स्वामी’ झाले का?”

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्याकडे स्वामी समर्थ म्हणतात ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’, तसे मोदी आता गद्दारांना म्हणतात भिऊ नका. आता मोदी नवे स्वामी झाले आहेत का?”

पुढे बोलताना त्यांनी टोला लगावला की, “पंतप्रधान मोदी कधी आंदोलकांना किंवा तरुणांना भेटत नाहीत, पण गद्दारांना आवर्जून भेटतात. बंद दाराआड झालेल्या चर्चेतील वाक्ये बाहेर येण्यामागे नक्की काय कारण आहे? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीने शिंदे गटातील खासदार टेन्शनमध्ये आल्याच्या बातम्यांनंतर हा धीर दिला जात आहे का? हा संदेश नक्की कोणाला दिला गेला—न्यायालयाला, अमित शाहांना की देवेंद्र फडणवीसांना?”

“इन्स्टावरून देश चालवण्याची वेळ आली आहे”

कोविड काळातील टीकेचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केली. “मी कोविड काळात जनतेशी संवाद साधण्यासाठी फेसबूक लाईव्ह करायचो, तेव्हा माझ्यावर टीका केली जायची. पण आता परिस्थिती अशी आहे की पंतप्रधान देशातील तरुणांना प्रत्यक्ष भेटत नाहीत, मात्र मध्यरात्री ‘फ्रेंड्स’ म्हणून इन्स्टाग्रामवरून संदेश पाठवत आहेत. आता इन्स्टावरून देश चालवण्याची वेळ आली आहे,” असा टोमणा त्यांनी मारला.

खासदार संजय राऊत यांनीही या भेटीवरून सकाळीच टीका केली होती. त्यानंतर दुपारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण घडामोडींवरून केंद्र सरकार आणि सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:10 08-08-2026