ओटीपी उशिरा येणे व पात्रतेनुसार पदे न दिसण्याच्या तक्रारी; शिक्षण विभागाकडून महत्त्वाच्या सूचना जारी
Maharashtra Teacher Recruitment News: तब्बल १५ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया (Pavitra Portal Teacher Recruitment) पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मात्र, पवित्र पोर्टलवरून उमेदवारांना पसंती क्रमांक (Preference Lock) नोंदवताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
सध्या पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवताना अनेक उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार विषय आणि पदांची पसंती उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच पोर्टलवर माहिती व्यवस्थित प्रदर्शित न होणे आणि संकेतस्थळावर (Website Server Load) प्रचंड ताण आल्यामुळे लॉगिन व लॉकिंगसाठी आवश्यक असणारा ‘ओटीपी’ (OTP) वेळेवर प्राप्त होत नसल्याने उमेदवार त्रस्त झाले आहेत.
शिक्षण विभागाने सुरुवातीला ६ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या कालावधीत पसंतीक्रम नोंदवण्याची मुदत दिली होती. तांत्रिक गोंधळामुळे यात दोन दिवसांची वाढ करून ती १३ ऑगस्टपर्यंत केली आहे. मात्र, ही मुदतवाढ अपुरी असून कमीत कमी एक आठवड्याची (७ दिवस) मुदतवाढ द्यावी, अशी जोरदार मागणी उमेदवार आणि शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाने परिपत्रक जारी करून उमेदवारांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी मान्य केल्या आहेत. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मुलाखतीशिवाय ७६,३९४ उमेदवारांचे आणि मुलाखतीसह ५६,२०६ उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट (Preference Generated) झाले आहेत.
शिक्षण विभागाने तांत्रिक अडचणींबाबत दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचना:
- मुदतवाढ: संकेतस्थळावरील प्रचंड ट्रॅफिक लक्षात घेता प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत ११ ऑगस्टऐवजी आता १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. उमेदवारांनी या वेळेत आपले प्राधान्यक्रम लॉक करावेत.
- ओटीपी (OTP) बाबत: एकाच वेळी हजारो उमेदवार लॉगिन करत असल्याने ओटीपी येण्यास काहीसा उशीर होत आहे. ‘OTP’ वर क्लिक केल्यानंतर तो लगेच न आल्यास काही वेळ वाट पाहावी; तात्काळ ‘Resend’ वर क्लिक करू नये. उशिरा आलेला ओटीपीसुद्धा स्वीकारला जातो. तरीही ओटीपी न मिळाल्यास काही वेळेनंतरच ‘Resend’ वर क्लिक करावे.
- ब्राउझर सेटिंग्ज: ज्या उमेदवारांना ओटीपी किंवा इतर तांत्रिक समस्या येत आहेत, त्यांनी आपल्या इंटरनेट ब्राउझरची ‘History’ आणि ‘Cache Clear’ करावी. त्यानंतरही अडचण दूर न झाल्यास ‘Incognito Window’ (Private Window) चा वापर करून फॉर्म भरावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 10-08-2026














