Mumbai Goa Highway News: मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून राज ठाकरे आक्रमक; माणगाव बायपासची पाहणी करत अधिकाऱ्यांना दिला थेट इशारा

‘राजकीय हस्तक्षेपामुळेच महामार्ग रखडला’; माणगावातील पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्षांचा सरकारवर घणाघाती हल्ला

Mumbai Goa Highway News: गेल्या १७ वर्षांपासून रडखडलेल्या आणि कोकणवासीयांच्या त्रासाला कारणीभूत ठरलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) कामाची मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी प्रत्यक्ष पाहणी केली. स्वतः गाडी चालवत रायगड जिल्ह्यातील माणगाव बायपास आणि रस्त्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी महामार्गाच्या निकृष्ट दर्जाबाबत आणि अधिकाऱ्यांच्या धोरणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला.

महामार्गाच्या पाहणीदरम्यान रस्त्यावर पसरलेली माती आणि कामाचा निकृष्ट दर्जा पाहून राज ठाकरे यांनी उपस्थित संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरले. “मी आता रस्ता पाहिला आहे, सगळीकडे मातीच माती दिसत आहे. हा रस्ता फार काळ टिकणार नाही, योग्य ती काळजी घ्या… नाहीतर सर्व पैसे वाया जातील,” असा थेट इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

महामार्गाची पाहणी करण्यापूर्वी राज ठाकरे यांनी माणगाव येथे पत्रकार परिषद घेऊन सरकार आणि स्थानिक नेतृत्वावर जोरदार टीका केली. “स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळेच मुंबई-गोवा महामार्गाचे काम इतकी वर्षे रखडले आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. तसेच, “कंत्राटदार पळून गेले असे सांगितले जाते, पण कंत्राटदारांना पळून जाण्यास कोणी भाग पाडले, याचा विचार केला पाहिजे,” असे म्हणत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

गणेशोत्सवाच्या तोंडावर दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे अतोनात हाल होतात. “कोकणात फिरल्यानंतर रस्त्याला लागणे म्हणजे काय असते, हे कळते,” असा टोला लगावत त्यांनी प्रस्तावित ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पावरूनही स्थानिकांच्या हिताला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. कोकणातील जमिनी टिकवून ठेवा आणि आपल्या हक्कासाठी जागरूक राहा, असा संदेशही त्यांनी यावेळी स्थानिक जनतेला दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 10-08-2026