राजकीय कटुता बाजूला ठेवून नेते एकत्र; शरद पवारांसोबत पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांच्या गप्पा रंगल्या
नवी दिल्ली:
Revati Sule Reception Delhi च्या निमित्ताने राजधानी दिल्लीत देशातील राजकीय विरोधक एकाच छताखाली एकत्र आल्याचे दुर्मिळ चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांच्या लग्नाचे भव्य रिसेप्शन सोमवारी संध्याकाळी दिल्लीत पार पडले. या सोहळ्याला देशातील प्रमुख नेत्यांसह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती.
या खास सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह अनेक बड्या राजकीय नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

राजकीय कटुता बाजूला; राहुल गांधी आणि अमित शाह एकाच वेळी मंचावर
एकीकडे संसदेत आणि राजकीय व्यासपीठावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी दररोज गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत असतात. मात्र, रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये राजकीय कटुता पूर्णपणे बाजूला राहिल्याचे दिसले.

अमित शाह आणि राहुल गांधी या दोन्ही नेत्यांनी एकाच वेळी या कार्यक्रमाला हजेरी लावली. जेव्हा गृहमंत्री अमित शाह नवदंपतीला शुभेच्छा देण्यासाठी मंचावर आले, त्यावेळी राहुल गांधी आणि सोनिया गांधी मंचाच्या खालील भागात उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.

पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांच्या गप्पांची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्यात जवळपास २० मिनिटे उपस्थिती लावली. यावेळी पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात रंगलेल्या खास गप्पांकडे उपस्थित सर्वांचेच लक्ष वेधले गेले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण पवार कुटुंबाची पंतप्रधानांशी ओळख करून दिली. त्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबाने पंतप्रधान मोदींसोबत एक विशेष फोटोही काढला.

उद्योगपती गौतम अदानींसह देशातील दिग्गजांची उपस्थिती
पंतप्रधान मोदींनंतर गृहमंत्री अमित शाह यांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी काही वेळ चर्चा केली. त्यापाठोपाठ सोनिया गांधी आणि शरद पवार हेही एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले.
या सोहळ्याला केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह देशभरातील अनेक उद्योगपती, सनदी अधिकारी आणि मान्यवरांनी उपस्थित राहून नवदांपत्य रेवती आणि सारंग यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 11-08-2026














