दिल्लीतील ‘६ जनपथ’वर राजकीय कटुता बाजूला; सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांचा हात धरून केली पंतप्रधानांशी ओळख
नवी दिल्ली:
Revati Sule Sarang Lakhani Reception चा सोहळा दिल्लीतील राजकीय वर्तुळात भलताच चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती आणि उद्योगपती अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडल्यानंतर, दिल्लीत त्यांच्या भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या दिल्लीतील ‘६ जनपथ’ या निवासस्थानी हा शाही सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली.
सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना ओढून पुढे आणले; व्हिडिओ तुफान व्हायरल
या रिसेप्शन सोहळ्यात सर्वात जास्त चर्चा रंगली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार रोहित पवार यांच्यातील भेटीची. जेव्हा पंतप्रधान मोदी नवदंपतीला शुभेच्छा देण्यासाठी मंचावर आले, तेव्हा सुप्रिया सुळे पवार कुटुंबातील तरुण पिढीची ओळख पंतप्रधानांशी करून देत होत्या.
सर्वजण मोदींना भेटण्यासाठी पुढे येत असताना, भाजप आणि सरकारवर सतत टीका करणारे आमदार रोहित पवार मात्र त्यांच्या पत्नी कुंती पवार यांच्यासह मागे उभे होते. हे लक्षात येताच खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांचा हात धरला आणि त्यांना खेचून थेट पंतप्रधानांच्या समोर उभे केले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
“रोहित, बहुत लढते हो, कभी हसा तो करो!”
रोहित पवार समोर आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत आपुलकीने त्यांच्या कामाची विचारणा केली. एवढेच नव्हे तर, रोहित पवारांच्या पत्नी कुंती पवार यांच्याकडे पाहत पंतप्रधान मोदी मिश्किलपणे म्हणाले, “रोहित, बहुत लढते हो… कभी हसा तो करो!”. पंतप्रधानांच्या या हलक्या-फुलक्या वक्तव्याने तिथे उपस्थित सर्वांमध्येच हशा पिकला.
भारतीय राजकारणातील सौहार्दाचे दर्शन
आमदार रोहित पवार हे नेहमीच केंद्र सरकार, भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांवर अत्यंत आक्रमकपणे टीका करत असतात. मात्र, राजकीय मतभेद बाजूला ठेवून कौटुंबिक आणि सामाजिक सोहळ्यात नेत्यांनी एकमेकांशी साधलेला हा मनमोकळा संवाद भारतीय लोकशाही आणि राजकारणातील सौहार्द अधोरेखित करणारा ठरला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 11-08-2026














